scorecardresearch

ठाकरे यांच्या भाषणात वैचारिक पातळी नव्हती!; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची टीका

सत्ता गेल्यावर उद्धव ठाकरे यांना हिंदूत्वाची आठवण झाली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दसरा मेळाव्यातील भाषण हे विचारांची मेजवानी असायची.

ठाकरे यांच्या भाषणात वैचारिक पातळी नव्हती!; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची टीका
नारायण राणे, उद्धव ठाकरे(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : सत्ता गेल्यावर उद्धव ठाकरे यांना हिंदूत्वाची आठवण झाली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दसरा मेळाव्यातील भाषण हे विचारांची मेजवानी असायची. उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणात वैचारिक पातळी नव्हती, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली. 

 अडीच वर्षे सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांना हिंदूत्व, महागाई यांसारख्या मुद्दय़ांचा विसर पडला होता. सत्ता गेल्यावर मात्र त्यांना हे मुद्दे आठवू लागले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणांमुळे शिवसैनिकांना सामाजिक कार्याची, विधायक कामाची प्रेरणा मिळत असे. उद्धव यांनी दसरा मेळाव्यात मात्र शिव्या, शाप देण्याखेरीज काहीच केले नाही. हिंदूत्वाचा विश्वासघात करून मुख्यमंत्रीपद मिळवलेल्या उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वाटचालीत काहीही योगदान दिले नाही. मी काय किंवा एकनाथ शिंदे यांच्यासारख्या अनेक सामान्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या वाढीसाठी योगदान दिले आहे, असेही ते म्हणाले.

२०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा वापर करून शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. मात्र भारतीय जनता पार्टीला दगा देऊन मुख्यमंत्रीपद मिळवणाऱ्या उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली, असेही राणे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या