No Megablock on Central Railways CSMT Kalyan and CSMT Panvel Harbor routes for Mahaparivartanndin mumbai | Loksatta

रविवारच्या मेगाब्लाॅकमधून मुंबईकरांची सुटका; महापरिनिर्वाणदिनानिमित्त मेगाब्लाॅक नाही

पश्चिम रेल्वेकडून शनिवारी मध्यरात्री मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे. महापरिनिर्वाणदिनासाठी मुंबईत येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

रविवारच्या मेगाब्लाॅकमधून मुंबईकरांची सुटका; महापरिनिर्वाणदिनानिमित्त मेगाब्लाॅक नाही
रविवारच्या मेगाब्लाॅकमधून प्रवाशांची सुटका (संग्रहित छायाचित्र)

रविवारच्या मेगाब्लाॅकमधून मुंबईतील प्रवाशांची सुटका झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत दोन दिवस आधीच मोठ्या संख्येने अनुयायी येण्याची शक्यता आहे. लोकल फेऱ्या आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक सुरळीत राहावे, यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने ४ डिसेंबर रोजी मेगाब्लाॅक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेकडून शनिवारी मध्यरात्री मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे. दरम्यान, ५ ते ७ डिसेंबरदरम्यान बेस्ट उपक्रमाकडून अतिरिक्त बसफेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

हेही वाचा- ओला, उबरच्या धर्तीवर बेस्टची टॅक्सी सेवा; पुढील सहा महिन्यांत ५०० टॅक्सी बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार

पश्चिम रेल्वेने ३ डिसेंबर रोजी सांताक्रुझ – गोरेगाव स्थानकांदरम्यान दोन्ही धीम्या मार्गावर मेगाब्लाॅक घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा ब्लाॅक ३ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.३० ते ४ डिसेंबरला पहाटे ४.३० वाजेपर्यंत असेल. त्यामुळे सांताक्रुझ – गोरेगाव स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर चालवण्यात येणार आहेत. रविवारी मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-कल्याण आणि सीएसएमटी-पनवेल हार्बर मार्गावर मेगाब्लाॅक नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा- मुंबईत ३ ते १७ डिसेंबर दरम्यान जमावबंदीचे आदेश; पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव; काय सुरू काय बंद? जाणून घ्या

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बेस्ट उपक्रमाने मुंबई, तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांसाठी दादर स्थानकावरून शिवाजी पार्क मैदान- चैत्यभूमी येथे जाण्याकरीता ‘चैत्यभूमी फेरी’ या नावाने अतिरिक्त बस सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील स्मृतीस्थळांना व दक्षिण मुंबईतील प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्याकरीता बेस्टकडून ७ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत अरिरिक्त बस उपलब्ध करण्यात येणार आहेत. यासाठी शिवाजी पार्क येथून सहा जादा बस सोडण्यात येणार असून प्रतीप्रवासी १५० रुपये प्रवास भाडे आकारण्यात येणार आहे. तसेच नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर येथील विविध भागांना भेट देण्यास इच्छुक असलेल्यांसाठी दैनंदिन बसपासची सुविधा उपलब्ध केली आहे. पासचे शुल्क ५० आणि ६० रुपये असेल. अखंडीत वीजपुरवठा ठेवण्याकरीताही बेस्टकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 21:23 IST
Next Story
ओला, उबरच्या धर्तीवर बेस्टची टॅक्सी सेवा; पुढील सहा महिन्यांत ५०० टॅक्सी बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार