दुर्घटनाग्रस्त सिंधुरक्षक पाणबुडीतून ११ मृतदेहांचे अवशेष बाहेर काढण्यात आले असले तरी उर्वरित ७ नौसैनिकांचे मृतदेह सापडण्याची शक्यता मावळली आहे. स्फोटामुळे निर्माण झालेल्या प्रचंड उष्णेतमुळे पाणबुडीचे अवशेषही वितळले होते. ते पाहता उर्वरित नौसैनिकांचे मृतावशेषही मिळणे अशक्य असल्याची माहिती नौदलाच्या सूत्रांनी दिली.
बाहेर काढण्यात आलेल्या मृतदेहांपैकी ६ जणांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटविण्यात आली आहे. पाच जणांच्या अवशेषांची तपासणी सोमवारी होणार आहे. परंतु अद्यापही पाणबुडीतील उर्वरित सात  मृतदेहांचे अवशेष सापडण्याची आशा मात्र आता मावळली आहे. हे सात जण पाणबुडीच्या पुढील भागात होते. क्षेपणास्त्रांच्या महाकाय स्फोटामुळे तेथील पोलादही वितळले होते. त्यामुळे या सात जणांचे अवशेष सापडणे अवघड असल्याची भीती नौदलाचे प्रवक्ते नरेंद्र विसपुते यांनी व्यक्त केली. या नौसैनिकांना सध्या बेपत्ता किंवा मृतही म्हणणे योग्य नाही. परंतु त्यांना हुतात्मा घोषित केले जाईल, असेही ते म्हणाले. १४ ऑगस्टपासून ही मोहीम सुरू असून ३० पाणबुडे, १५ क्लिनर्स आणि ३ फ्लॅग ऑफिसर्स अहोरात्र हे काम करत आहेत. पाणबुडीच्या खालील भागात मोठे भगदाड पडल्याने पाणी काढण्यात अपयश येत आहे. त्यामुळे आता विशेष बलून्स (फुगे) वापरून पाणबुडी वर काढण्याचे प्रयत्न केले जातील, असे विसपुते म्हणाले. महिनाभर हे काम चालणार आहे. आंतराराष्ट्रीय कंपन्यांच्या मदतीने हे काम सुरू असून त्यासाठी कोटय़वधी रुपयांचा खर्च आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

* १३ ऑगस्टच्या रात्री मुंबईत नौदलाच्या ‘सिंधुरक्षक’ या पाणबुडीत प्रचंड स्फोट झाल्याने ती बुडाली होती. या दुर्घटनेत तीन अधिकाऱ्यांसह १८ नौसैनिकांना आपले प्राण गमवावे लागले होते.