scorecardresearch

“आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही, दाबणारा कधीच जन्माला येणार नाही”

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं विधान

“आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही, दाबणारा कधीच जन्माला येणार नाही”

“आपला आवाज कुणीच दाबू शकत नाही, अन् आपला आवाज दाबणारा कधीच जन्माला येऊ शकत नाही.” असं विधान शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलं.

उद्धव ठाकरे म्हणाले, “सर्वप्रथम आपल्या सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा देतो. मला पण बरं वाटलं बऱ्याच दिवसानंतर सर्वांना साद घालता आली. आजचा हा क्षण आपल्या आयुष्यात फार महत्वाचा व मोलाचा आहे. सुवर्ण क्षण असतो हा. जी परंपरा शिवसेना प्रमुखांनी १९६६ मध्ये सुरू केली. ती समर्थपणे तुमच्या सर्वांच्या सोबतीने आपण पुढे नेत आहोत, याचा मला अभिमान आहे. माझ्यासाठी हा क्षण आणि हा दिवस आपल्या सगळ्यांचे एकत्रित आशीर्वाद घेण्यासाठीचा असतो. आपण पाहिलं असेल, शस्त्रपुजन झाल्यानंतर मी माझ्या खऱ्या शस्त्रांची पुजा केली, आपल्यावर फुलं उधळली. ही माझी खरी शस्त्र आहेत, ही शिवसेना प्रमुखांना मला दिलेली आहे. आणि हे आशीर्वाद घेत असताना, माझ्या मनात नेहमी एक नम्र भावना असते. हेच प्रेम सर्वप्रथम प्रत्येक जन्मी मला माझे हेच आई-वडील मिळाले पाहिजेत. माझं कुटुंब माझं परिवार हाच मिळाला पाहिजे. जन्मही महाराष्ट्रातच पाहिजे आणि मला स्वतःला मी मुख्यमंत्री आहे, असं कधीही वाटू नये. मला तर सोडाच,पण माझ्या सर्व जनतेला देखील मी मुख्यमंत्री आहे असं वाटता कामा नये. मी तुमच्या घरातला कुणी तरी आहे तुमचा भाऊ आहे.असं वाटो ही माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे.”

तसेच “ कारण, काही जणांना असं वाटतं जे बोलत होते मी पुन्हा येईन.. ते बोलताय आता मी गेलोच नाही, गेलोच नाही. बस तिकडेच. पण जे संस्कार असतात, जी संस्कृती असते ती हीच असते, जे माझ्या आजोबांनी शिकवलं माझ्या वडिलांना आणि माझ्या वडिलांनी व आईने शिकवलं मला. ही पदं काय आहेत? सत्ता तरी काय आहे? पदं येतील जातील, परत येतील. सत्ता येईल-जाईल, परत येईल. ती आली तरी पुन्हा येईल. पण कधीही मी कुणी आहे, अहमपणा तुझ्या डोक्यात ज जाऊ देऊ नकोस. ज्या क्षणी तुझ्या डोक्यात हवा जाईल, त्या क्षणी तू संपलास. नेहमी जनतेशी नम्र रहा. तो प्रयत्न मी माझा करत असतो, नम्रपणाने आशीर्वाद घेत असतो. हे आशीर्वाद हीच तर ताकद आहे, हे मागून कोणाला मिळत नाही. हे खरं वैभव आहे हे खरं ऐश्वर्य आहे. हे जोरजबरदस्तीने मिळत नसतात ते कमावावे लागतात आणि ती कमावण्याची परंपरा ही आपल्याला मिळालेली आहे. ” असं देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवलं.

याचबरोबर “ काहीकाही गोष्टींचं मला नवल वाटतं. मी काय बोलणार कोणाचा समचार घेणार? कोणाचे वाभाडे काढणार? बऱ्याच दिवसानंतर बोलतोय. एकतर मनामध्ये विषयांची गर्दी झालेली आहे. पण पंचायत अशी आहे की करोनामध्ये गर्दी नाही चालत. गर्दीत प्रत्येका विचारू देखील शकत नाही की दोन लसी घेतल्या आहेत का? विचारांना कसं विचारणार? विचाराणांना मास्क कसा घालणार? पण तरी मला हे देखील माहिती आहे, की माझ्या भाषणानंतर अनेकजण माझं भाषण संपतय कधी? आणि चिरकायला मिळतय कधी? तोंडामध्ये बोटं घालूनच बसलेले आहेत. की याचं भाषण होतंय कधी आणि आम्ही चिरकतोय कधी? चिरकू द्या. त्यांना उत्तर देण्यासाठी मी तुमच्याशी बोलत नाही, तर मी तुमच्यासाठी बोलतोय. मी माझ्या टीकाकारांसाठी बोलत नाही. मी तुमच्यासाठी बोलतोय, जनता जनार्दनासाठी बोलतोय, माता-भगिनींसाठी बोलतोय. ” असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

विजयदशमी निमित्त दरवर्षी होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा, करोनाची साथ नियंत्रणात आल्याने यंदा ऑनलाइनऐवजी थेट घेण्यात आला. मात्र,उपस्थितीच्या मर्यादेमुळे नेहमीप्रमाणे शिवाजी पार्कऐवजी यंदाचा दसरा मेळावा हा षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-10-2021 at 18:59 IST

संबंधित बातम्या