मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट मनसेसोबत युती करण्याच्या तयारीत असला तरी काँग्रेस मात्र अद्यापही यासाठी तयार नसल्याचे काँग्रेसच्या राज्य निवडणूक मंडळाच्या दोन दिवसीय बैठकीत समोर आले आहे. नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत स्थानिक पातळीवर समविचारी पक्षांशी आघाडी करण्याबाबत चर्चा झाली. एकीकडे वंचित, शेकाप, रासप यांच्याशी आघाडीशी तयारी दाखवण्यात आली असताना मनसेसोबत आघाडीचा प्रस्ताव कोणत्याच जिल्ह्यातून न आल्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.
नाशिक महापालिकेत मनसेसोबत युती करण्याचा प्रस्ताव स्थानिक पातळीवर तयार झाल्यानंतर त्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून तिव्र विराेध दर्शविण्यात आला. या बैठकीशी संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्याचे पडसाद दोन दिवसीय राज्य निवडणूक मंडळाच्या बैठकीतही उमटले. याविषयीची माहिती प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी दिली. राज्य निवडणूक मंडळाच्या दोन दिवस झालेल्या बैठकीत नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करून उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय समिकरणे वेगळी आहेत. स्थानिक पातळीवर समविचारी पक्षांशी चर्चा करून आघाडी करण्यात आली आहे. काही जिल्ह्यांत वंचित बहुजन आघाडी, शेकाप, शेतकरी संघटना, रासप यांच्याशी आघाडी झालेली आहे. मनेसशी आघाडी करण्यासंदर्भात कोणत्याच जिल्ह्यातून प्रस्ताव आलेला नाही, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी दोन राष्ट्रवादी एकत्र येतील त्या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी आघाडी न करण्याचेही या बैठकीत ठरविण्यात आले आहे. याव्यतिरिक्त मनसेसोबत आघाडीबाबतही स्थानिक पातळीवर निर्णय न घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
भाजपा पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
चंद्रपूर जिल्ह्यातील भाजप आमदार बंटी भागडिया यांचे कट्टर समर्थक आणि भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री जुनेद खान यांनी आपल्या सहकाऱ्यांसह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. महायुतीमध्ये फसवणूक झाल्याची भावना तीनही पक्षातील असंख्य पदाधिकाऱ्यांच्या मनात वाढीस लागलेली आहे. आगामी काळात सत्ताधारी पक्षातील अनेक महत्वाचे नेते काँग्रेस पक्षात प्रवेश करतील, असे हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले..
