लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासोबत दुपारी २ वाजता झालेल्या बैठकीमध्ये कोणताही तोडगा न निघाल्याने आता आरोग्य सेविका व आशा सेविकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाल्याशिवाय माघार घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आशा सेविका व आरोग्य सेविकांचे आंदोलन सुरूच आहे.

आरोग्य सेविका व आशा सेविका यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाची दखल घेत डॉ. सुधाकर शिंदे यांनी बुधवारी दुपारी २ वाजता सविस्तर चर्चा करण्यासाठी वेळ दिली होती. बुधवारी दुपारी दीड ते दोन तास झालेल्या चर्चेमध्ये कोणताच सकारात्मक निर्णय झाला नाही. त्यामुळे आशा सेविका व आरोग्य सेविका निराश झाल्या. मात्र सायंकाळपर्यंत मुख्यमंत्री कार्यालयातून चर्चेसाठी बोलावणे येण्याची शक्यता होती. मात्र मुख्यमंत्र्यांकडूनही बोलावणे न आलेल्या संतप्त झालेल्या आशा सेविका व आरोग्य सेविका आक्रमक झाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाल्याशिवाय माघार घ्यायची नाही, असा भूमिका त्यांनी घेतली.

आणखी वाचा-मुंबई : पीएफआयच्या तीन सदस्यांना उच्च न्यायालयाने जामीन नाकारला

किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी व निवृत्तीवेतन, प्रसूती विषयी फायदे, गटविमा योजना लागू करावी किंवा १५ हजार रुपये वार्षिक विम्याचा हप्ता द्यावा, दर महिन्याच्या १ ते १० तारखेपर्यंत वेतन मिळावे, महापालिकेच्या आरोग्यसेविकांच्या रिक्त जागांवर आशासे विकांची नियुक्ती करावी, आदी विविध मागण्यांसाठी मंगळवारी सकाळपासून आशा सेविका आणि आरोग्य सेविकांनी आझाद मैदानात बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.