मुंबई : औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराच्या निर्णयाला स्थगिती दिल्यामुळे चौफेर टीका होऊ लागताच राज्य मंत्रिमंडळाच्या शनिवारी होणाऱ्या बैठकीत नामांतराचा पुन्हा निर्णय घेऊन तांत्रिक दुरुस्ती केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी जाहीर केले. यासाठी आज, शनिवारी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलाविण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत महाविकास आघाडी सरकारच्या काळातील शेवटच्या दिवशी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांना स्थगिती देण्यात आली. त्यात औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराचा विषय होता. ‘लोकसत्ता’ने नामांतराला दिलेल्या स्थगितीवर प्रकाश टाकला होता. त्याची राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटली. शिंदे- फडणवीस सरकारला औरंगजेब, उस्मानचे एवढे प्रेम का, असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होता. तसेच हे सरकार हिंदूत्वविरोधी असल्याचा आरोप केला 

होता. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरांमध्ये सरकारच्या स्थगितीच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. दोन्ही जिल्ह्यांमध्ये शिवसेनेने शिंदे आणि भाजपला लक्ष्य केले होते.

राजकीय पक्षांनी केलेली टीका, शिवसेनेने वातावरण तापविण्याचा सुरू केलेला प्रयत्न यांमुळे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना नामांतराच्या मुद्दय़ावर सावध भूमिका घ्यावी लागली. औरंगाबाद, उस्मानाबाद या नामांतराच्या निर्णयांना स्थगिती देण्यात आलेली नाही. फक्त जुन्या सरकारने अवैधरीत्या नामांतराचा निर्णय घेतल्याचा दावा करीत तांत्रिक बाब पूर्ण करून याबाबत लवकरच दोन्ही शहरे आणि नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

श्रेयवादाचा खटाटोप?

औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. हे निर्णय आता मुख्यमंत्री शिंदे पुन्हा जाहीर करणार आहेत. हा सारा श्रेयवादासाठीचा खटाटोप असल्याची टीका होत आहे.

नामांतराचे हे निर्णय अवैध असल्यामुळेच ते पुन्हा एकदा नव्याने घेतले जाणार असून तिन्ही नावे कायम ठेवली जातील.

देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No stay on renaming of aurangabad and osmanabad shinde fadnavis government zws
First published on: 16-07-2022 at 04:40 IST