मुंबई : नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (जेवर विमानतळ) उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील जेवर येथे स्थित एक महत्त्वाकांक्षी ग्रीनफील्ड प्रकल्प आहे. दिल्ली-एनसीआर आणि पश्चिम उत्तर प्रदेशला विमान सेवा मिळेल. १५ जून पासून या विमानतळावरून व्यावसायिक विमानसेवा सुरू होणार असून इंडिगो, अकासा एअर आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या कंपन्या इथून सेवा सुरू करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ मार्च रोजी नोएडा विमानतळाचे अधिकृत उद्घाटन झाले आहे. पहिल्या टप्प्यात १ धावपट्टी आणि वार्षिक १२ दशलक्ष प्रवाशांची हाताळण्याची क्षमता असणार आहे. नोएडा विमानतळ दिल्ली-वाराणसी हाय-स्पीड रेल कॉरिडॉर आणि भविष्यातील मेट्रो विस्ताराशी जोडले जाणार आहे. झुरिच एअरपोर्ट इंटरनॅशनल एजी या स्विस कंपनीद्वारे विकसित केले जात आहे. विमानतळावर भारतीय संस्कृती आणि आधुनिक सुविधांचा मेळ घातला आहे. नोएडा विमानतळामुळे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी करण्यास मदत होईल. तसेच विशेषतः मथुरा, वृंदावन, आग्रा या शहरातील पर्यटन व औद्योगिक विकासाला चालना देईल

१५ जून २०२६ रोजी पहिली व्यावसायिक विमानसेवा बेंगळुरूसाठी सकाळी ८:३५ वाजता उड्डाण करणार आहे. सुरुवातीला लखनऊ, हैदराबादसह १० प्रमुख मार्गांवर सेवा उपलब्ध असणार आहे. नोएडा विमानतळ पूर्ण झाल्यावर भारतातील सर्वात मोठ्या विमानतळांपैकी एक असेल. दीर्घकालीन योजनेनुसार, भविष्यात या विमानतळाची क्षमता दरवर्षी ७० दशलक्ष प्रवाशांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. लवकरच विमानांचे वेळापत्रक, गंतव्यस्थाने आणि प्रवासी सुविधांची सविस्तर माहिती जाहीर केली जाणार आहे.

राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील हवाई प्रवासाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी हे विमानतळ तयार करण्यात आले आहे. यामुळे या प्रदेशातील दळणवळण, व्यापार, पर्यटन आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने शाश्वत रचना आणि पर्यावरणास अनुकूल कार्यपद्धतींद्वारे ‘नेट-झिरो’ (कार्बन तटस्थ) उत्सर्जन साध्य करण्याची आपली कटिबद्धता अधोरेखित केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटनानंतर, विमानतळाने ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीकडून ‘एरोड्रोम सिक्युरिटी प्रोग्राम’ची मंजुरी मिळवली आहे. या मंजुरीमुळे विमानतळाची सुरक्षा चौकट आणि कार्यप्रणाली नियमांच्या अधीन असल्याचे स्पष्ट होते. या विमानतळाचा अधिकृत आयएटीए कोड डीएक्सएन असा आहे.