मुंबई : गतवर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीत राज्यभरात  ध्वनी पातळीत वाढ नोंदवली गेली. ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या नोंदीनुसार दिवाळीतील दिवसाच्या ध्वनी पातळीत १.५ टक्के  तर रात्रीच्या ध्वनी पातळीत २.७७ टक्के  वाढ झाली आहे; मात्र गतवर्षीची दिवाळी शांततेत गेल्याने यावर्षी झालेली वाढ फोर मोठी नाही.

‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’ने संपूर्ण राज्यात १५२ ठिकाणी फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचे मापन केले. वसई-विरार येथे दिवसाच्या ध्वनी पातळीत सर्वाधिक १०.५५ टक्के  वाढ झाली. यंदा ७१.६६ डेसिबल ध्वनी पातळी आढळली.

मीरा-भाईंदर येथे ध्वनी पातळीत ९.९० टक्के  इतकी दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक वाढ झाली. येथे यंदा ७१.३२ डेसिबल इतकी ध्वनी पातळी होती. दक्षिण मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथील ध्वनी पातळी ७०.०९ डेसिबलवरून ७६.७९ डेसिबलपर्यंत पोहोचली. तीत ९.५६ टक्के  वाढ झाली. रात्रीच्या ध्वनी पातळीचा विचार करता  दक्षिण मुंबई पहिल्या स्थानावर आहे. येथे रात्रीच्या ध्वनी पातळीत गतवर्षीच्या तुलनेत १९.३३ टक्के  वाढ झाली. येथील ध्वनी पातळी ५९.०४ डेसिबलवरून ७०.४५ डेसिबलपर्यंत पोहोचली.

रात्रीच्या ध्वनी पातळीत दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक वाढ भिवंडी-निजामपूर येथे, तर तिसऱ्या क्रमांकाची वाढ मुंबईच्या पश्चिम उपनगरात दिसून आली. भिवंडी निजामपूर येथे यावर्षी ६३.४४ डेसिबल ध्वनी पातळी होती. पश्चिम उपनगरात यावर्षी ६५.२२ डेसिबल ध्वनी पातळी होती.

ध्वनी पातळीच्या नोंदी केवळ फटाक्यांच्या आवाजाच्या नाहीत. गेल्यावर्षी टाळेबंदी होती, यावर्षी उद्योग सुरू झाले आहेत. त्यामुळेही ध्वनी पातळी वाढली आहे.

डॉ. व्ही. मोटघरे, सहसंचालक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ