मुंबईत जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळता सगळी दुकानं बंद, मद्यविक्रीही बंद

मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांचे आदेश

छाया : प्रशांत नाडकर

मुंबईत जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळता सगळी दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी यासंदर्भातले आदेश दिले आहेत. यामधे मुंबईत मद्यविक्रीची घाऊक आणि किरकोळ दुकानं बंद राहतील असंही सांगण्यात आलं आहे. काही वेळापूर्वीच हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. केंद्र सरकारने लॉकडाउन जरी १७ मेपर्यंत वाढवला असला तरीही काही प्रमाणात दुकानं उघडण्यासाठी सूट दिली होती. यामध्ये वाईन शॉप्स आणि इमारतीत असलेल्या दुकानांचे शटर वर गेले होते. मात्र आता नव्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या दुकानांशिवाय सगळं काही बंद राहणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील दुकानांना काही प्रमाणात सूट दिल्यानंतर, शहरात अनेक ठिकाणी नियमांची पायमल्ली झाल्याच्या घटना घडल्या होत्या..त्यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून या निर्णय घेण्यात आलाय..

मुंबई पोलिसांनी यापूर्वीच १७ तारखेपर्यंत रात्री आठ ते सकाळी सात पर्यंत शहरात कलम १४४ लावलं होतं..मुंबईत करोना रुग्णांची संख्या १० हजारांचा टप्पा गाठू शकते. कारण मुंबईत आज आढळलेल्या करोना रुग्णांसह एकूण रुग्णसंख्या ९ हजार ७०० च्या पुढे गेली आहे. गर्दी टाळण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय आयुक्त प्रवीण परदेशी यांनी घेतला आहे.

टाळेबंदीतून प्रतिबंधित क्षेत्र वगळून अन्य ठिकाणी मद्या विक्री दुकानांसह एकल दुकाने सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली होती. मात्र करोनाच्या अधिक प्रादुर्भावामुळे लाल क्षेत्रात नोंद झालेल्या मुंबईत केवळ जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने खुली ठेवण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी मंगळवारी दिले. त्यामुळे गेले दोन दिवस मुंबईतील काही भागात सुरू करण्यात आलेली मद्या विक्रीची दुकाने बुधवारपासून बंद ठेवावी लागणार आहेत.

राज्य सरकारने प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणची मद्य विक्री दुकाने आणि एकल दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली होती. तसेच एका ठिकाणी पाचपेक्षा अधिक दुकाने उघडल्यास बंदी घालण्यात आली होती. एकूणच या संदर्भात संभ्रम निर्माण झाला होता. राज्य सरकारने या संदर्भात निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार प्रवीणसिंह परदेशी यांनी वरील आदेश दिले.

राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी अटीसापेक्ष मद्य विक्रीची घाऊक आणि किरकोळ दुकाने उघडण्यास ४ मे रोजी परवानगी दिली होती. मात्र ही दुकाने खुली होताच अनेक ग्राहकांनी मद्य खरेदीसाठी गर्दी केली होती. तर काही दुकानांच्या बाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राखण्याच्या निर्देशांचा पुरता बोजवारा उडाला होता. यामुळे करोनाच्या संसर्गाचा धोका वाढण्याची अधिक शक्यता होती. तसेच मद्य विक्रीची दुकाने सुरू झाल्यामुळे विविध स्तरातून टीका होऊ लागली होती.

मुंबईमधील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्ण संख्या कमी होण्यास अद्यााप सुरुवात झालेली नाही. अशा परिस्थितीत नागरिकांनी गर्दी करणे योग्य होणार नाही. तसेच नागरिकांच्या गर्दीमुंळे टाळेबंदीच्या मुळ उद्देशाला बाधा निर्माण होऊ शकते. केंद्र सरकारने मुंबई लाल क्षेत्रात असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मुंबईवर काही बंधने घालण्यात आली आहेत. ही बाब लक्षात घेत पूर्वीप्रमाणे मुंबईतील केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली ठेवता येतील, असे आदेश प्रवीणसिंह परदेशी यांनी मंगळवारी दिले. या आदेशांनुसार मुंबईतील मद्य विक्रीची आणि जीवनावश्यकेतर दुकाने बुधवारपासून बंद ठेवावी लागणार आहेत. नागरिकांची गरज लक्षात घेऊन केवळ किराणा सामान आणि औषधांची दुकानेच सुरू ठेवण्यास नव्या आदेशात परवानगी देण्यात आली आहे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Non essential shops and establishments and liquor shops closed in mumbai revised guidelines municipal commissioner scj

ताज्या बातम्या