मुंबई : आर्थिक अडचणीमुळे पालकांना शुल्क भरण्यासाठी काही दिवसांची मुदत मागूनही दहिसरमधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील प्रशासनाने पाचवीतील विद्यार्थिनीला वर्गात बसू न देता वाचनालयात बसविल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थिनी मानसिक तणावाखाली वावरत असल्याने पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दहिसर येथील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाचव्या इयत्तेत शिकणाऱ्या संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांनी पहिल्या सत्राचे शुल्क भरले होते. मात्र, काही आर्थिक अडचणीमुळे दुसऱ्या सत्राचे शुल्क भरण्यास त्यांना विलंब लागणार आहे. त्यामुळे पालकांनी भर ‘पालक-शिक्षक सभे’मध्ये आपली शुल्क भरण्याची आपली तयारी आहे. मात्र शुल्क भरण्यासाठी काही दिवसांची मुदत हवी असल्याचे पालकांनी शिक्षक व शाळा प्रशासनाला सांगितले होते. मात्र त्यानंतरही शाळा प्रशासनाने विद्यार्थिनीला काही दिवस वर्गाऐवजी वाचनालयात बसवले. त्यामुळे नियमित अध्यापनापासून ती विद्यार्थिनी वंचित राहत असल्याने अभ्यासात मागे पडण्याची भीती पालकांनी व्यक्त केली. इतर विद्यार्थ्यांसमोर वेगळे बसवण्याच्या या प्रकारामुळे मुलीच्या मनावरही परिणाम होत असल्याचे पालकांनी सांगितले.
शुल्क भरण्याबाबत पालक आणि शाळा प्रशासन यांच्यात चर्चा सुरू असताना विद्यार्थिनीवर अशी कारवाई करणे अन्यायकारक आहे. आर्थिक अडचणी तात्पुरत्या असू शकतात, मात्र शिक्षण हा मूलभूत हक्क असून कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्याला वर्गाबाहेर ठेवता येत नाही, अशी तरतूद शिक्षण हक्क कायद्यात स्पष्टपणे नमूद आहे. त्यामुळे शाळेची कारवाई नियमबाह्य असून शिक्षण विभागाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी ग्लोबल पेरेंट्स टीचर्स असोसिएशनच्या रोहित दंडवते यांनी शाळा प्रशासनाला पत्र पाठवून या अन्यायाविरोधात दाद मागितली आहे. अशा प्रकारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याने शाळांनी अधिक संवेदनशीलतेने वागण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका दिप्ती वाघेला यांच्याशी भ्रमणध्वनीवरून वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

