मुंबई : गेले काही दिवस मुंबईने ढगाळ हवामान अनुभवले असले तरी संपूर्ण एप्रिल महिन्याचा विचार करता मुंबईत तापमान सर्वसाधारण राहिले आहे. महिन्याभरात मुंबईचे किमान तापमान २२ ते २८ अंश सेल्सिअसदरम्यान तर कमाल तापमान ३२ ते ३६ अंश सेल्सिअसदरम्यान राहिले आहे. हवामान विभागाने जाहीर के लेल्या सांताक्रुझ येथील नोंदीच्या आलेखावरून ही बाब स्पष्ट झाली आहे. नोंदीनुसार तापमान कमी दिसत असले तरी आद्र्रतेमुळे उकाडा अधिक जाणवत आहे.
सांताक्रुझ येथे गुरुवारी ३४ अंश सेल्सिअस आणि कुलाबा येथे ३३.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. बुधवारच्या तुलनेत कमाल तापमानात मुळीच फरक पडलेला नाही. किमान तापमानातही किं चित फरक पडला. गुरुवारी सांताक्रुझ येथे २७.२ अंश सेल्सिअस आणि कु लाबा येथे २६.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पुढील २ दिवस मुंबईसह संपूर्ण कोकणपट्ट्यात ढगाळ हवामान राहणार आहे. मुंबई, ठाण्यात २ मेपर्यंत मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही २ मेपर्यंत दुपारी किं वा सायंकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कु लाबा येथे शुक्रवारी सकाळी ८९ टक्के आणि सायंकाळी ८१ टक्के आद्र्रतेची नोंद झाली. सांताक्रुझ येथे शुक्रवारी सकाळी ७३ टक्के आणि सायंकाळी ७१ टक्के आर्द्रतेची नोंद झाली.