मुंबई : अमेरिकेत मराठी चित्रपटसृष्टी उभारण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर विविधांगी उपक्रम हाती घेतलेल्या ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ने (नाफा) आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कुठल्याही प्रकारे आर्थिक फायदा न घेता सातासमुद्रापार मराठी चित्रपटांना प्रेक्षकवर्ग उपलब्ध करून देण्यासाठी धडपडणारी ‘नाफा’ आता नवीन वर्षात स्वत:चे मराठी ओटीटी सुरू करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकास्थित उद्योजक, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या चित्रपटांचे निर्माते अभिजित घोलप यांच्या संकल्पनेतून २०२४ मध्ये ‘नाफा’ची सुरूवात झाली. अमेरिकेत पहिल्यांदाच ‘मराठी चित्रपट महोत्सवा’ची सुरूवात ‘नाफा’ने केली. त्यापाठोपाठ भारतात आणि अमेरिकेत एकाच तारखेला मराठी चित्रपट प्रदर्शित करून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीच्या कक्षा रुंदावण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आता आणखी एक पाऊल पुढे टाकत मराठी चित्रपटांना हक्काचे ओटीटी माध्यम मिळवून देण्यासाठी ‘नाफा’ने ओटीटी वाहिनी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘नाफा स्ट्रीम’ हे ओटीटी प्लॅटफॉर्म स्वतंत्र आणि प्रयोगशील मराठी चित्रपट निर्मात्यांना आधार देणारे विदेशातील पहिले सामर्थ्यशाली माध्यम ठरणार आहे, अशी माहिती ‘नाफा’चे संस्थापक अध्यक्ष अभिजीत घोलप यांनी दिली.

चित्रपट निर्मात्यांसाठी पारदर्शक महसूल-वाटप मॉडेल विकसित करण्याचा ‘नाफा’ प्रयत्न करीत आहे. आज अनेक निर्माते आपली संपूर्ण पुंजी खर्चून, कुटुंबाची स्वप्ने बाजूला ठेवून, फक्त आपल्या कलाकृतीवरच्या प्रेमासाठी चित्रपट बनवतात. परंतु त्यांना योग्य मंच आणि योग्य परतावा फार क्वचित मिळतो. म्हणूनच ‘नाफा’ या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून ‘नाफा स्ट्रीम’ ओटीटीच्या माध्यमातून एक नावीन्यपूर्ण मॉडेल विकसित करण्यासाठी उत्सुक असल्याचेगी घोलप यांनी स्पष्ट केले. खास नॉर्थ अमेरिकन चोखंदळ प्रेक्षकांसाठी ‘नाफा स्ट्रीम’ ओटीटी असून महाराष्ट्रातील निर्माते – कलावंतांनी आमच्याशी थेट संपर्क केल्यास त्यांच्या कलाकृतींचा प्राधान्याने विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

‘नाफा स्ट्रीम’वर गेल्या काही दशकांतील अभिजात मराठी चित्रपट, नवे चित्रपट, वादविवादामुळे किंवा सेन्सॉर मंजुरी न मिळालेले अथवा वितरणाच्या अडचणींमुळे आजवर प्रदर्शित न होऊ शकलेले दर्जेदार आशयघन चित्रपट, विविध विषयांवरील माहितीपट, वेबमालिका, म्युझिक अल्बम्स, गाजलेल्या मराठी मालिका पाहायला मिळणार आहेत. निर्मात्यांना ‘नाफा स्ट्रीम’शी info@nafaglobal.org या मेलवर अथवा https://northamericanfilmassociation.org/ या संकेतस्थळावर थेट संपर्क साधता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.