मुंबई : उत्तर सिक्कीममध्ये झालेल्या भूस्खलनामुळे नव्याने बांधलेल्या एका पुलाचा भाग कोसळला असून यामुळे लाचेनचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. भूस्खलनांमुळे आणि पूल कोसळल्यामुळे महत्त्वाच्या रस्त्यांशी संपर्क तुटल्याने उत्तर सिक्कीममध्ये अडकलेल्या हजरो पर्यटकांची सुटका करण्यासाठीभारतीय सैन्याच्या त्रिशक्ती कॉर्प्सकडून ‘ऑपरेशन हिम सेतू’ मोहीम राबविण्यात येत आहे.

पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यात पाऊस, वादळी वारे आणि बर्फवृष्टी होत आहे. सिक्कीम येथेही मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी सुरू आहे. सततच्या वादळामुळे आणि अनेक आठवड्यांपासून सुरू असलेल्या प्रचंड बर्फवृष्टीमुळे या परिसरात आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे. तसेच उत्तर सिक्कीममधील मोठ्या भूस्खलनामुळे नव्याने बांधलेल्या पुलाचा काही भाग कोसळला. हा पूल फेब्रुवारी महिन्यात वाहतुकीसाठी खुला करण्यात होता. पूल कोसळल्यामुळे १ हजाराहून अधिक पर्यटक अडकले असून भारतीय सैन्याकडून त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी

प्रयत्न केले जात आहेत. यासाठी बुधवारपासून ‘ऑपरेशन हिम सेतू’ मोहीम राबविण्यात येत असून आतापर्यंत एकूण १३५ पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून इतर पर्यटकांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज असलेल्या नागरिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे. सध्या भारत-चीन सीमेच्या जवळ प्रचंड बर्फवृष्टी होत असून बचाव पथकाला अत्यंत प्रतिकूल हवामानाचा सामना करत पर्यटकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत.

तारुम चु परिसरातील रस्ता आणि नव्याने बांधलेल्या पूल कोसळल्यामुळे या भागात आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे. सैन्याने कोसळलेल्या पुलाच्या ठिकाणी तात्पुरता वापरता येईल अशा पुलाची उभारणी केली असून या पुलाद्वारे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी आणून पुढे सिक्कीमची राजधानी गंगटोक येथे पाठवण्यात येत आहे. ‘प्रचंड बर्फवृष्टी आणि प्रतिकूल हवामान असूनही त्रिशक्ती कॉर्प्स बचावकार्याकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. १३५ पर्यटकांची सुरक्षित सुटका करण्यात आली असून वैद्यकीय उपचारांची गरज असलेल्या नागरिकांना प्राधान्य देण्यात येत आहे,’ असे संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सिक्कीम येथे निर्माण झालेल्या या आपत्कालीन परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी विविध यंत्रणा प्रयत्न करीत आहेत. तसेच या भागात वैद्यकीय मदतही पोहचविण्यात येत आहे. तसेच बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनकडून बर्फ हटविण्याचे आणि रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे.