Sahil Wakode Suicide Caste Discrimination IIT Bombay: ‘आयआयटी मुंबई’च्या एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाचा विद्यार्थी साहिल वाकोडेने (वय २२) आत्महत्या केल्यानंतर शैक्षणिक वातावरण ढवळून निघाले आहे. या घटनेनंतर आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यामुळे प्रशासनाने एफआयआरमध्ये नाव असलेल्या प्राध्यापकावर कारवाई केल्याची माहिती दिली. दरम्यान आता साहिलच्या मित्रांनी त्याच्याबद्दलची माहिती माध्यमांना दिली आहे. यावेळी त्यांनी जातीयवादाचा आरोप फेटाळून लावत आत्महत्येमागे संभाव्य कारणे काय असावीत, याची चर्चा केली.
साहिल वाकोडेच्या आत्महत्येनंतर आयआयटी कॅम्पसमध्ये जातीयवाद होत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यातच प्राध्यापकांविरुद्ध विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारल्यामुळे परस्परविरोधी दावे करण्यात आले. दुसरीकडे विद्यार्थ्यांचा एक गट जातीयवादाचे कारण फेटाळून लावत आहे. साहिलच्या मृत्यूनंतर पीटीआयशी संवाद साधताना काही मित्रांनी त्याच्याबद्दलच्या आठवणी आणि आयआयटी कॅम्पसमधील वातावरणासंबंधी भाष्य केले.
एका विद्यार्थ्याने पीटीआयशी बोलताना सांगितले की, साहिल आत्महत्या करेल, असा विचारही कोणाच्या मनात आला नाही किंवा त्याच्या स्वभावात काहीही वेगळे असे वाटले नव्हते. मी परीक्षेच्या चार-पाच दिवस आधी त्याला भेटलो होतो. तेव्हा तो नेहमीसारखाच होता. आनंदी, मजेत आणि मनमोकळ्या गप्पा मारणाऱ्या साहिलमध्ये आम्हाला काही वेगळे वाटले नव्हते.
परीक्षेच्या दिवशी काय झाले असावे? असा प्रश्न विचारला असता विद्यार्थ्याने म्हटले की, त्याला कॉपी करताना पकडले गेले, असे सांगितले जाते. पर्यवेक्षकाने त्याला वर्गाबाहेर नेले आणि त्याच्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई करणार नाही, असे प्रशासनाने सांगितले होते. मात्र त्यानंतर काय झाले, याची आम्हाला कल्पना नाही.
माझा पहिला मित्र
साहिलच्या आठवणी सांगताना मित्राने म्हटले की, आम्ही पहिल्या वर्षी कॅम्पसमध्ये आल्यानंतर साहिल माझा पहिला मित्र झाला होता. आमची खोली अगदी शेजारी होती. माझ्या चांगल्या मित्रांपैकी तो एक होता. मी त्याच्याबरोबर बॅडमिंटन खेळायचो, अशी माहिती एरोस्पेस इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या साहिलच्या मित्राने दिली.
साहिल वाकोडेच्या कुटुंबीयांनी त्याला मागील काही काळापासून जातीय स्वरूपाच्या अपमानाला आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप केला आहे. त्याच्या वडिलांनीही प्राध्यापकांकडून जातीवाचक वक्तव्ये केल्याचा आरोप केला. या तक्रारीच्या आधारे पवई पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदी लावल्या आहेत.
जातीयवादाचा विषय नाही
साहिलच्या आणखी एका मित्राने एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, हा विषय जातीयवादाचा असावा, असे वाटत नाही. कारण मी त्याचा कधी अनुभव घेतलेला नाही. पण खरी अडचण दुसरीच आहे. विद्यार्थ्यांना तणावाचा सामना करावा लागतो. कॉपी करणे वाईट आहे, पण त्याला हाताळताना तुम्हाला विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीचाही अंदाज घ्यावा लागेल. विद्यार्थ्यांशी बोलावे लागेल.
“आम्हाला साहिलची कमतरता जाणवेल. तो खूप चांगला होता. असे मित्र गमावणे ही निश्चितच चांगली बाब नाही”, अशी खंतही त्याच्या मित्रांनी व्यक्त केली.
