पेट्रोलवर कर कपातीचा पूर्ण फायदा नाहीच, लिटरमागे इतके रुपये झाले कमी

कर कपातीमुळे महाराष्ट्रात पेट्रोल पाच रुपयांनी स्वस्त झाल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात ग्राहकांना या कर कपातीचा पूर्ण फायदा मिळालेला नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींची नुकतीच बैठक आयोजित केली होती.

महाराष्ट्रात पेट्रोल पाच रुपयांनी स्वस्त झाल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात ग्राहकांना या कर कपातीचा पूर्ण फायदा मिळालेला नाही. महाराष्ट्रात प्रति लिटर पेट्रोलवर ४.३७ रुपये कमी झाले असून आज मुंबईत प्रति लिटर पेट्रोलचा दर ८६.९७ रुपये आहे. डिझेलवर २.६५ रुपये कमी झाले असून प्रति लिटर डिझेलचा दर ७७.४५ रुपये आहे.

डिझेलवर केंद्राने अडीच रुपयांची करकपात केली असली, तरी राज्याने मात्र कर कायम ठेवल्याने डिझेलचे दर प्रतिलिटर अडीच रुपयांनीच कमी झाले आहेत. इंधनावर आकारले जाणारे केंद्रीय उत्पादन शुल्क कमी करण्यात आले असून प्रति लिटर दीड रुपयांचा केंद्र सरकार तर एक रुपयांचा बोजा तेल कंपन्या उचलतील, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्रत पेट्रोलवरील कर अडीच रुपयांनी कमी केल्याने सरकारी तिजोरीला वार्षिक १२५० कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागणार असल्याची माहिती, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यू. पी. एस. मदान यांनी दिली. तर कर कपातीमुळे लोकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. त्याचबरोबर देशाचा विचार करता डिझेलच्या दराबाबत महाराष्ट्राचा आठवा क्रमांक असल्याने सध्या डिझेलवरील करात कपात केली नसल्याचेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.

केंद्राप्रमाणे राज्यांनीही मूल्यवर्धित करात अडीच रुपयांची कपात करण्याचे आवाहन जेटली यांनी केले. या आवाहनला भाजपची सत्ता असलेल्या राज्यांनी तातडीने प्रतिसाद दिला. त्यामुळे महाराष्ट्रासह, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, उत्तर प्रदेश, त्रिपुरा आदी राज्यांमध्ये इंधन दरकपात प्रति लिटर पाच रुपये झाली आहे. इंधनाचे दर ६० डॉलरवरून ८५ डॉलर इतके झाले. म्हणजे २५ डॉलरची वाढ झाली. राज्यांच्या महसुलातही २९ टक्के वाढ झाली. त्यामुळे त्यांच्या तिजोरीत अतिरिक्त निधी जमा झाला असल्याने मूल्यवर्धित कर कमी करण्यास हरकत नाही, असे जेटली यांनी स्पष्ट केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Not getting full benefit of reduction in petrol diesel price

ताज्या बातम्या