मुंबई : होय, मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे. लोकांच्या डोळय़ांतील अश्रू पुसण्याचे आणि महाराष्ट्राचा विकास करण्याचे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदूत्व पुढे नेण्याचे कंत्राट मी घेतले आहे. असंगाशी संग करण्यापेक्षा हे बरे. पण टोमणेसेनेला आम्हाला हिणवण्याशिवाय काही येत नाही, अशी राजकीय फटकेबाजी करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना आमदारांना टोला लगावला.

अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. आमच्या सरकारकडे बहुमत असून आम्हाला भाडोत्री फौजफाटय़ाची गरज नाही. मागील सरकारमध्ये मुख्यमंत्री असताना एकटे देवेंद्र फडणवीस सर्व विरोधकांना पुरून उरायचे. आता तर आम्ही दोघे आहोत. माझे कलागुण दाखवण्याची संधीच कधी मिळाली नाही. माझ्यात पण गुणवत्ता आहे ना. तुम्ही लोकांनी मला कधी व्यासपीठच मिळू दिले नाही, अशी टोलेबाजीही एकनाथ शिंदे यांनी केली.

पाहा व्हिडीओ –

मंत्रिमंडळातील खातेवाटप आणि मंत्रीपदाची संधी न मिळणे यावरून नाराज असलेल्या आमदारांवरून बुधवारी शिंदे-फडणवीस सरकारला जयंत पाटील यांनी कोपरखळय़ा मारल्या होत्या. तसेच मनावर दगड न ठेवता मुख्यमंत्री करण्याचा प्रस्तावही एकनाथ शिंदे यांना दिला होता. त्या भाषणाचा उल्लेख करत जयंत पाटील यांच्या भाषणांमुळे सभागृहातील वातावरण जिवंत झाले, रंगत आली. आमच्याकडच्या नाराजीवर बोलता पण जयंतराव तुम्हालाच खरे तर विरोधी पक्षनेतेपद हवे होते, पण ते अजित पवारांमुळे मिळाले नाही हे आम्हाला माहिती आहे, असा चिमटा शिंदे यांनी काढला.

करेक्ट कार्यक्रम..

जयंत पाटील माझ्याशी खासगीत बोलत असतात. अडीच वर्षांपूर्वी अजित पवार यांचे सरकार फसल्यावर, त्यांनी मला सांगितले नाही. सांगितले असते तर फसले नसते, करेक्ट कार्यक्रम केला असता, असे जयंत पाटील म्हणाले होते, असे गुपित शिंदे यांनी फोडल्यानंतर सभागृहात हशा पिकला.