म्हाडासमोर पेच; जाहिरातीद्वारे आवाहन करणार

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून मार्च २०२० मध्ये तीन गिरण्यांच्या जागेवरील ३८९४ घरांसाठी सोडत काढण्यात आली होती. या सोडतीतील विजेत्यांना मंडळाकडून प्रथम सूचना पत्रे पाठवण्यात आली आहेत. मात्र ४०० हून अधिक विजेत्यांची पत्रे पुन्हा मंडळाकडे परत आली आहेत. नमूद पत्त्यावर विजेते नसल्याने ती पत्रे परत आली आहेत. तेव्हा जर वेळेत विजेत्यांनी कागदपत्रे सादर केली नाहीत तर त्यांना हक्काच्या घराला मुकावे लागणार आहे. त्यामुळे आता पत्र परत आलेल्या विजेत्यांची यादी तयार केली असून लवकरच वृत्तपत्रात जाहिरात प्रकाशित करून त्यांना पत्र घेऊन जाण्याची विनंती मंडळाकडून केली जाणार आहे.

बॉम्बे डाईंग टेक्स्टाईल मिल, बॉम्बे डाईंग स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलच्या जागांवर उभारण्यात आलेल्या तीन हजार ८९४ घरांसाठी मार्च २०२० मध्ये सोडत काढण्यात आली होती. मात्र सोडतीनंतर काही दिवसांतच उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या देखरेख समितीने सोडतीवर स्थगिती आणली. ही स्थगिती अद्याप उठलेली नाही. यात बराच वेळ जात असल्याने किमान पात्रता निश्चितीची प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचा निर्णय मुंबई मंडळाने घेतला. त्यानुसार विजेत्यांना प्रथम सूचना पत्र पाठवत त्यांची कागदपत्रे जमा करून घेतली जात आहेत. आतापर्यंत पाठवलेल्या तीन हजार ८९४ पत्रांपैकी ४०० हून अधिक पत्रे पोस्टाकडून मंडळाला परत करण्यात आल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

..अन्यथा घरांना मुकणार?

प्रथम सूचना पत्र हे घराचा ताबा मिळवण्यासाठीची पहिली आणि सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे. हे पत्र मिळाल्यानंतरच कागदपत्रे जमा करत विजेत्यांची पात्रता निश्चिती केली जाते. नंतर पात्र विजेत्यांना घराचा ताबा दिला जातो. असे असताना ४०० हून अधिक गिरणी कामगारांची पत्रे परत आली आहेत. या विजेत्यांनी निश्चित वेळेत कागदपत्रे जमा केली नाहीत तर त्यांचे घर रद्द होईल, त्यांना घराला मुकावे लागेल. असे होऊ नये यासाठी आता आम्ही लवकरच म्हाडाच्या संकेतस्थळावर या विजेत्यांची यादी जाहीर करणार आहोत. तसेच वृत्तपत्रातही याची जाहिरात प्रकाशित करून त्यांना म्हाडा भवनात येऊन पत्र घेऊन जाण्याचे आवाहन करणार असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.