scorecardresearch

‘मेट्रो ४’च्या कंत्राटदारांना नोटीस

वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली या ‘मेट्रो ४’च्या मार्गाच्या कामातील पाचपैकी (पॅकेज) तीन टप्प्यांत काम संथगतीने सुरू आहे.

वडाळा-ठाणे प्रकल्पाच्या कामात दिरंगाईचा ठपका

मुंबई : वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली या ‘मेट्रो ४’च्या मार्गाच्या कामातील पाचपैकी (पॅकेज) तीन टप्प्यांत काम संथगतीने सुरू आहे. कामाचा वेग वाढवण्याचे आदेश देऊनदेखील कंत्राटदारांकडून दिरंगाई सुरू असल्याने आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कंत्राटदारांना नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि ठाणे ही शहरे मेट्रो सेवेने जोडण्यासाठी ‘मेट्रो ४’ प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले. एकूण पाच टप्प्यांत मार्गाचे बांधकाम करण्यात येत असून पाच टप्प्यांसाठी पाच कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. वडाळा ते अमर महल जंक्शन, गारुडिया नगर ते सूर्या नगर, गांधीनगर ते सोनापूर, मुलुंड अग्निशमन केंद्र ते माजिवडा आणि कापूरबावडी ते कासारवडवली अशा टप्प्यांत हे काम सुरू आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी प्रत्येक टप्प्याकरिता एमएमआरडीएने मुदत ठरवून दिली होती. मात्र, ती मुदत टळूनदेखील कामे पूर्ण होऊ शकलेली नाहीत.

पाच टप्प्यांपैकी तीन टप्प्यांत काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. परिणामी, प्रकल्पास विलंब होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तिन्ही टप्प्यांतील कंत्राटदाराला कामाचा वेग वाढविण्याचे आदेश देण्यात आले. मात्र त्यानंतरही कामाचा वेग वाढत नसल्याने आता एमएमआरडीएने तिन्ही टप्प्यांतील कंत्राटदारांना नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी याला दुजोरा दिला आहे. या नोटिशीनंतरही कामाचा वेग वाढला नाही तर कंत्राटदाराविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. मेट्रो ४ हा दोन महानगरांना जोडणारा महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आहे. हा मार्ग २०२४ मध्ये पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. त्यामुळे कामाला गती देणे एमएमआरडीएसाठी क्रमप्राप्त आहे. अशा परिस्थितीत पाचपैकी तीन टप्प्यांत काम संथगतीने होणे परवडणारे नाही. त्यामुळेच आता कठोर निर्णय घेण्यात येईल, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Notice metro contractors project work ysh

ताज्या बातम्या