मुंबई: कोणत्याही प्रकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्यांना तोंड देण्यासाठी पोलीस आम्ही तयार आणि सज्ज असल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी मंगळवारी सांगितले. याप्रकरणी राज्यभरात १५ हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, तर १३ हजार जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास दोन लाख अधिक पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाच्या ८७ कंपन्या व ३० हजार गृहरक्षक सतर्क ठेवण्यात आले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ मे रोजी औरंगाबाद येथे केलेल्या भाषणात मशिदींतील भोंगे न काढल्यास ४ मेपासून मशिदीबाहेर हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिला होता. त्या पाश्वर्भूमीवर पोलीस कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचे सेठ यांनी सांगितले. औरंगाबादचे पोलीस आयुक्तांनी ठाकरे यांच्या भाषणाची पडताळणी केली असून याप्रकरणी ते योग्य ती कारवाई करतील, असेही सेठ म्हणाले. पोलीस सज्ज गृहमंत्र्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेसाठी बैठक घेतली. याशिवाय राज्यभर शांतता ठेवण्यासाठी मोहल्ला समितीसोबत अनेक बैठका घेतल्या आहेत. कोणत्याही कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्येला तोंड देण्यासाठी आणि कोणतीही परिस्थितीला हाताळण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. सर्व पोलिसांच्या सुटय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. गुन्हेगार, समाजकंटकांकडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी १५ हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, तर १३ हजार जणांना नोटिसाही बजावल्या आहेत. स्थानिक पातळीवर पोलिसांच्या अनेक बैठका घेतल्या आहेत. ८७ राज्य राखीव पोलीस दलाच्या कंपन्या आणि ३० हजारांहून अधिक गृहरक्षक राज्यभर तैनात आहेत. यावेळी सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे सेठ यांनी सांगितले.

मुंबई एक हजारापेक्षा जास्त जणांना नोटीस

 मनसेच्या इशाऱ्यानंतर मुंबई पोलीसही सज्ज झाले असून शहरात मंगळवार सकाळपर्यंत एक हजारपेक्षा अधिक जणांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे. त्यात सीआरपीसी कलम १४४ अंतर्गत (जमावबंदी) ४५५ तर सीआरपीसी कलम १४९ अंतर्गत ८०१ जणांना नोटीस बजावल्या आहेत. याशिवाय सीआरपीसी कलम १५१(३) अंतर्गत (दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य, कृत्य) १७२ जणांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. याशिवाय राज्यभरात मनसे अधिकाऱ्यांची धरपकड करण्यात आली. यावेळी घाटकोपर येथील मनसे नेते महेंद्र भानुशाली यांना भोंग्यांसह पोलिसांनी ताब्यात घेतले.