भारतात प्रत्यार्पणासाठी प्रयत्न, मुंबईत अनेक गुन्हे

मुंबई : कुख्यात गुंड सुरेश पुजारीला फिलिपाइन्स येथे स्थानिक पोलिसांच्या गुप्तहेर विभागाने नुकतीच अटक केली. सुरेश पुजारीविरोधात मुंबई, ठाणे परिसरात अनेक गुन्हे दाखल आहेत. २००७ मध्ये पुजारी देश सोडून पळाला होता.

फिलिपाइन्स देशातील परानाक्यू शहरात सुरेश बसप्पा पुरी ऊर्फ सतीश शेखर पै ऊर्फ सुरेश पुजारी नावाच्या व्यक्तीला संशयाच्या आधारावर गुप्तहेर विभागाने १५ ऑक्टोबरला अटक केले. त्याच्याकडे आवश्यक कागदपत्रे सापडली नाहीत. पुजारी फिलिपाइन्समध्ये २० सप्टेंबरपासून वास्तव्यास होता. भारतीय यंत्रणा आता त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पुजारी उल्हासनगर, अंबरनाथ परिसरात सक्रिय होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,तो पूर्वी कुख्यात गुंड रवी पुजारीबरोबर काम करत होता. त्यानंतर सुरेश पुजारीने रवी पुजारीपासून दूर होत स्वत:ची टोळी बनवली. मुंबई व ठाण्यातील २५ व्यावसायिकांना खंडणीसाठी सुरेश पुजारी टोळीच्या वतीने २०१८ मध्ये धमकावण्यात आले होते. त्यानंतर १० जानेवारी २०१८ मध्ये भिवंडीतील एका हॉटेलमध्ये खंडणीच्या वादातून गोळीबार झाला. त्या गोळीबारात तेथील स्वागत कक्षातील महिला कर्मचारी जखमी झाली होती. या गोळीबारानंतर मुंबई व ठाण्यातील अनेक व्यावसायिकांना पुजारीने पुन्हा दूरध्वनी करून गोळीबाराची जबाबदारी स्वीकारून आधी मागितलेल्या रकमेपेक्षा दुप्पट रकमेची मागणी केली. मुंबईतील कॅमेरा व्यावसायिकाकडे आरोपींनी सुरुवातीला ५० लाखांची मागणी केली होती. गोळीबारानंतर पुजारीने धमकावत एक कोटी मागितले होते.