scorecardresearch

‘सध्या देशात एकच वाघ तो म्हणजे..,’ देवेंद्र फडणवीसांनी घेतलं ‘या’ नेत्याचं नाव

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कालच्या सभेवरून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

फोटो सौजन्य- अमित चक्रवर्ती/ इंडियन एक्स्प्रेस

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कालच्या सभेवरून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. वाघाचे फोटो काढले म्हणून कुणाला वाघ होता येत नाही. त्यासाठी निधड्या छातीनं आव्हानांचा सामना करावा लागतो. नुसती फोटोग्राफी करून वाघ होता येत नाही, असा टोला फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

कालच्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले होते की, ‘बाळासाहेब ठाकरे भोळे होते. पण मी भोळा नाही धूर्त आहे.’ या विधानावरून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला आहे. त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, “हो, वाघ भोळाच असतो. बाळासाहेब ठाकरे भोळे होते. पण धूर्त कोण असतं, हे तुम्हाला माहीत आहे. मी त्या प्राण्याचं नाव घेणार नाही. कारण त्यांनी पातळी सोडली म्हणून मला पातळी सोडायची नाही.”

त्यांनी पुढे म्हटलं की, ‘हो, बाळासाहेब ठाकरे वाघ होतेच पण आता देशात केवळ एकच वाघ आहे. आणि त्या वाघाचं नाव म्हणजे नरेंद्र मोदी आहे. शिवसेनेच्या म्हणण्यानुसार मंदिरातील घंटा वाजणारा हिंदू नको, तर आतंकवाद्याला बडवणारा हिंदू पाहिजे. हो आतंकवाद्याला बडणारा हिंदू म्हणजे नरेंद्र मोदी आहेत. भारतीय जवानावर हल्ला झाल्यानंतर सीमापार जाऊन सर्जीकल स्टाईल करणारा हिंदू नरेंद्र मोदी आहे. त्यांनी सीमेमध्ये घुसून दहशतवाद्यांना मारलं.”

अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांचा उल्लेख वाघ असा केला आहे. सध्या देशात एकच वाघ आहे, असंही ते म्हणाले. कालच्या उद्धव ठाकरेंच्या भाषणाला प्रत्युत्तर देण्यासाठी घेतलेल्या उत्तर सभेत त्यांनी अनेक मुद्यांवरून महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Now in country there is only one tiger and his name is narendra modi devendra fadanavis live rally update rmm