एसटी महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठी आता कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला तर त्यांना ‘प्रोत्साहन भत्ता’ देण्यात येणार आहे. आपल्या बसमध्ये प्रवासी संख्या वाढविल्यास दिवसाला कमाल १०० रुपये तर महिन्याला कमाल ५०० रुपये कर्मचाऱ्यांना आता मिळवता येणार आहेत. ही योजना प्रायोगिक तत्वावर दोन टप्प्यात राबविण्यात येणार असून २३ फेब्रुवारी ते १५ एप्रिल या काळात पहिला टप्पा सुरू होणार आहे.
तोटय़ातील एसटीने तोटा भरून काढण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यातील ‘प्रवासी वाढवा उत्पन्न वाढवा’ या योजनेअंतर्गत हा ‘प्रोत्साहन भत्ता’ सुरू करण्यात आला आहे. एखाद्या मार्गावरील नियमित उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न मिळाले तर चालक/वाहक/यांत्रिक आणि आगारातील अन्य कर्मचारी यांना त्या वाढीव उत्पन्नातील ३५ टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यात येणार आहे.  
उत्पन्नावर आधारित या योजनेमध्ये चालक/वाहकांना वाढीव उत्पन्नाच्या २४ टक्के, यांत्रिक कर्मचाऱ्यांना ७ टक्के आणि उर्वरित चार टक्के रक्कम आगारातील अन्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. चालक-वाहकांना ही रक्कम रोजच्या रोज तर अन्य कर्मचाऱ्यांना दरमहा वाटप करण्यात येईल.
उत्पन्न वाढीसाठी असलेल्या या योजनेमध्ये २४ दिवस कामावर हजर असलेल्या कर्मचाऱ्यांनाच पात्र ठरविले जाणार आहे. वाहकाने आणलेले निव्वळ मासिक उत्पन्न उद्दिष्टापेक्षा जास्त असेल तरच इतर वाहतूक आणि यांत्रिक कर्मचारी या भत्त्यास पात्र ठरणार आहेत.
चालक-वाहकांचा भत्ता हा दोघांमध्ये समप्रमाणात वाटण्यात येणार आहे. चालक-वाहकांनी दैनंदिन कामगिरीचा हिशोब दिल्यावर त्यांना भत्ता देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या चार टक्के भत्त्यामध्ये आगारातील यांत्रिक कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, सहाय्यक कर्मचारी अधीक्षक, प्रभारक, मुख्य कारागीर, इंधन-कार्यशाळा-भांडार लिपिक आदींमध्ये विभागून देण्यात येणार आहे. या प्रोत्साहन भत्त्याचा दुसरा टप्पा १५ जून ते १५ सप्टेंबर दरम्यान असणार आहे.