मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी (नीट पीजी) प्रवेश परीक्षेतील गुणांचा निकष शून्य केल्यानंतर अवघ्या एका दिवसात अनिवासी भारतीय (एनआरआय) कोटय़ातील प्रवेशासाठी ६०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे आवश्यक कागदपत्रे विद्यार्थ्यांना एका दिवसातच उपलब्ध झाल्याने या नोंदणीबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहेत. गुणवत्तेचा विचार न करता पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठीचे पात्रता गुण शून्य करण्यात आले. या निर्णयाचे लाभार्थी होण्यासाठी आता पदवीधर डॉक्टरांची झुंबड उडाली आहे. एकूण जागांपैकी १५ टक्के जागा परदेशात राहणाऱ्या परंतु भारतीय नागरिकत्व असलेल्या विद्यार्थ्यांसाठी राखलेल्या असतात.
या कोटय़ात प्रवेश घेण्यासाठी एनआरआय असल्याचे विद्यार्थ्यांना सिद्ध करावे लागते. पदव्युत्तर प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर करण्यात आली तेव्हा या कोटय़ातील प्रवेशासाठी ९७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. २० सप्टेंबर रोजी पदव्युत्तर प्रवेशासाठी पात्रता शून्य गुण करण्यात आली. निकष बदलल्यामुळे २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते २२ सप्टेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी वेळ देण्यात आला. नोंदणी करतानाच सर्व कागदपत्रेही अपलोड करणे आवश्यक होते. या २४ तासांत एनआरआय कोटय़ासाठी जवळपास ७०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एनआरआय कोटय़ातून प्रवेश घेताना अर्जदाराला अनेक कागदपत्रे सादर करावी लागतात.




पासपोर्ट, व्हिसाबरोबरच विद्यार्थी ज्या देशातील निवासी आहेत तेथील दूतावासाचे पत्रही लागते. तसेच शिक्षणाचा खर्च उचलत असल्याचे परदेशात राहणाऱ्या पालकांचे प्रतिज्ञापत्र, त्यांची ओळख सिद्ध करणारी कागदपत्रे असे सर्व नोंदणी अर्जाबरोबरच ऑनलाईन अर्जाला जोडावे लागतात. यातील दूतावासाचे पत्र मिळण्यासाठीच विद्यार्थ्यांना अनेक खटाटोप करावे लागता. त्यासाठी १०० ते २०० डॉलर्सचा खर्चही करावा लागतो. ही कागदपत्रे मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक महिने जातात. मात्र, नव्याने अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही सर्व कागदपत्रे एका दिवसात उपलब्ध झाली आहेत. एका दिवसात एवढी कागदपत्रे कशी जमा झाली, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
कागदपत्रांवर शंका का?
पदव्युत्तर पदवी प्रवेश परीक्षेचा निकाल मार्च महिन्यात जाहीर झाला. जुलै-ऑगस्टमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. आतापर्यंत प्रवेशाचे निकष शिथील केले तरीही २०० गुणांपेक्षा कमी गुण असलेले विद्यार्थी पात्र ठरण्याचीची फारशी उदाहरणे नाहीत. कागदपत्रे मिळवणे जिकिरीचे आणि खर्चीक असते. त्यांची वैधताही सहा महिनेच असते. त्यामुळे आधीपासून विद्यार्थी कागदपत्रे गोळा करून ठेवत नाहीत. असे असताना एका दिवसांत विद्यार्थ्यांना कागदपत्रे मिळणे शंकास्पद असल्याचे वैद्यकीय प्रवेशतज्ज्ञ सुधा शेणॉय यांनी सांगितले.