मुंबई : विविध स्तरातून विरोध वाढल्यानंतर त्रिभाषा सूत्रासंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात आले. या पार्श्वभूमीवर राज आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात होणाऱ्या मराठीच्या विजयी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. वरळीतील एनएससीआय डोम येथे हा मेळावा होत असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले

राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी व सदस्य, मराठी कलाकार आणि सर्वसामान्य नागरिकांनी ‘एनएससीआय डोम हाऊसफुल्ल’ झाले आहे. त्यामुळे आता डोमचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. परिणामी राज आणि उद्धव ठाकरेंना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी हुकल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. मात्र डोममध्ये प्रवेश करू न शकलेल्या नागरिकांना डोमबाहेर मोठ्या एलईडी स्क्रीनवर मेळावा पाहण्याची व्यवस्था केली आहे.

राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या मुद्द्यावरून राजकीय व सामाजिक वातावरण पेटलेले पाहायला मिळाले. त्यानंतर विविध स्तरातून विरोध वाढल्यानंतर त्रिभाषा सूत्रासंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात आले. या पार्श्वभूमीवर राज आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मराठीच्या विजयी मेळाव्याचे वरळीतील एनएससीआय डोम येथे आयोजन करण्यात आले आहे.

अनेक वर्षांनंतर ठाकरे बंधूंना एकाच व्यासपीठावर पाहण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. ‘एनएससीआय डोम हाऊसफुल्ल’ झाले असून कार्यकर्ते व नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. वरळी गावातील आस्तिक ब्रास बँडच्या तालावर, विविध मराठी गाण्यांच्या ठेक्यावर उपस्थित नागरिक मनसोक्तपणे नाचत आहेत. अनेकजण विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेऊन उंचावत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय असो, मराठी शिक…नाहीतर निघ…, आवाज कोणाचा, मराठीचा.. आदी विविध घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला आहे. तर मेळाव्याला आलेल्या नागरिकांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात वाहनतळाची व्यवस्था केली आहे. त्यामुळे तिथून चालत ‘एनएससीआय डोम’ येथे यायला ५ ते १० मिनिटे लागत आहेत.  ‘एनएससीआय डोम हाऊसफुल्ल’ झाल्यामुळे आता बाहेरही एलईडी स्क्रीनवर मेळावा पाहण्यासाठी प्रचंड प्रमाणात गर्दी झाली आहे. तसेच, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वरळीसह आसपासच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.