मुंबई : नागरी सहकारी बँका महाराष्ट्रात सर्वाधिक असून गुजरात, कर्नाटक व गोवा राज्यांचा त्यानंतर क्रमांक लागतो. त्यामुळे या बँकांचे शिखर संघटन असलेल्या राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाचे (एनयुसीएफडीसी) मुख्य कार्यालय दिल्लीतून मुंबईत आणण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी केली.
शहा यांच्या हस्ते नागरी सहकारी बँकांसाठीच्या विविध सेवा आणि मुंबईतील कार्यालयाचा प्रारंभ शनिवारी मुंबई शेअर बाजार इमारतीच्या वर्तुळ सभागृहात झाला. त्या वेळी ते बोलत होते. देशातील नागरी बँकांकडे ६ लाख कोटींच्या ठेवी आहेत. या बँकांना व्यवसायामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. शिखर संघटनेमुळे त्या सर्व अडचणी आता दूर होतील, यामुळे नागरी सहकार क्षेत्राला नवसंजीवनी प्राप्त होईल. या बँकांना आता कर्मचारी प्रशिक्षण, सायबर सुरक्षा, क्लाऊड कम्पुटींग आणि कोअर बँकींगची सुविधा एका छत्राखाली उपलब्ध होतील. त्यामुळे स्पर्धात्मक, पारदर्शी आणि सुलभ बँकींग सेवांचा लाभ ग्राहकांना मिळणार आहे. ठेवीदारांचा विश्वास वाढण्यास मदत होणार असून नागरी बँकिंग क्षेत्र बळकट होईल, असा दावा शहा यांनी केला.
लहान कर्जदार प्रामाणिक असतात. गृहिणी, छोटे व्यावसायीक, दुकानदार, एमएसएमई यांच्यावर नागरी सहकारी बँकांनी लक्ष द्यावे. ‘सहकारातून समृद्धी’चा अर्थ संस्थेची समृद्धी नसून, बँकेच्या ग्राहकाला समृद्ध करणे हा आहे. रोजगार देणाऱ्यांना वित्त पुरवठा झाला पाहिजे. पण, केवळ भांडवलाने भारत समृद्ध होणार नाही. त्यासाठी मजबूत व्यवस्था उभारली पाहिजे आणि ती सहकारातून उभी राहील, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. देशातील १४०० नागरी सहकारी बँकांपैकी ६९० बँका शिखर संघटनेच्या सदस्य आहेत. उर्वरित बँकांनी सदस्यत्व घ्यावे. सदस्यत्वाचे शुल्क परवडणारे ठेवा, अशी सूचना शहा यांनी केली.
भारतीय अर्थव्यवस्थेत लहान बँकांचे योगदान आहे. छोट्या रकमेतूनच भांडवल उभे राहते आणि मोठा व्यापार करता येतो. ‘अमूल’ मध्ये ५० आणि १०० रुपयांचा शेअर आहे. पण, ३३ लाख महिलांचे त्यात योगदान आहे. त्यातून ‘अमूल’ने आज १ लाख २५ हजार कोटींचा व्यवसाय उभारला. नागरी सहकारी बँकासाठी रिझर्व्ह बँक आपल्या धोरणामध्ये बदल करते आहे. २०२३ मध्ये सहकार मंत्रालय स्थापन झाले. एनयुसीएफडीसीची स्थापना त्यानंतरची मोठी उपलब्धी आहे, असे शाह म्हणाले.
कोअर बँकिंग सर्व्हिस, सायबर सुरक्षेसंदर्भातील सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटर व इतर सेवांचे यावेळी उद्घाटन करण्यात आले. भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी उप-महाव्यवस्थापक जी. पी. मिस्त्री यांनी लिहिलेल्या ‘ऑपरेशनल रिस्क मॅनेजमेंट – अ प्रॅक्टिकल गाईड टू अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार तसेच सर्व राज्यातील नागरी सहकारी बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महामंडळाचे अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता यांनी तर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभात चतुर्वेदी आभार यांनी मानले.
