केंद्राच्या सध्याच्या अणुऊर्जा धोरणात कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचे माहिती केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी कुमार यांनी दिली. जुन्या धोरणानुसार निश्चित ध्येयाकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पर्यावरण, वने तसेच विज्ञान व तंत्रज्ञानासंदर्भातील संसदीय स्थायी समिती दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर होती. शनिवारी या समितीने भाभा अणू संशोधन केंद्राला भेट दिली. तेथे अणुऊर्जेसंदर्भातील विविध विषयावर चर्चा झाल्यानंतर एक पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी कुमार बोलत होते. देशातील नागरी अणुऊर्जा कार्यक्रमाच्या मुद्यावर 'न्युक्लियर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया' (एनपीसीआयएल) आणि अणू ऊर्जा विभागाशी महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे कुमार यांनी सांगितले. अणुऊर्जा कार्यक्रम आणि त्याची सुरक्षा यांसह विविध मुद्दयांवर यावेळी चर्चा झाली. आजपर्यंत आपण ५५७० मेगावॅट अणू ऊर्जा निर्मिती करत असून येत्या काळात कुडनकुलम दोन प्रकल्प सुरू झाल्यानंतर यात आणखी १००० मेगावॉट ऊर्जा निर्मिती होऊ शकेल असे ते म्हणाले. नागरी अणुऊर्जा कार्यक्रमाच्या आधुनिकीकरणासाठी भारतीय खाजगी कंपन्या एनपीसीआयएल बरोबर सहकार्य करायला तयार असल्याचे ते म्हणाले. कर्करोगाच्या उपचारासाठी अणुशक्तीचा वापर करून वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देशातील विविध भागांत अणू औषध केंद्रांची स्थापना करण्या येणार असल्याचे कुमार यांनी यावेळी स्पष्ट केले.