scorecardresearch

राज्यात बाधित बालकांमध्ये महिन्याभरात चार टक्क्यांनी वाढ

ज्यात जुलैपर्यंत १० वर्षांखालील २ लाख १८ तर ११ वर्षांवरील ४ लाख ६३ हजार बालकांना करोनाची बाधा झालेली होती.

राज्यात बाधित बालकांमध्ये महिन्याभरात चार टक्क्यांनी वाढ

११ वर्षांवरील मुलांमध्ये प्रमाण अधिक
शैलजा तिवले, लोकसत्ता
मुंबई : राज्यात करोनाबाधित झालेल्या मुलांच्या संख्येत महिन्याभरात चार टक्क्यांनी वाढ झाल्याचे आढळले आहे. या काळात ११ वर्षांवरील सर्वाधिक १८ हजार ४१३ बालकांना संसर्ग झालाआहे.

राज्यात जुलैपर्यंत १० वर्षांखालील २ लाख १८ तर ११ वर्षांवरील ४ लाख ६३ हजार बालकांना करोनाची बाधा झालेली होती. सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत मात्र रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे आढळले आहे. ६ सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार १० वर्षांखालील ६७३८ बालकांना नव्याने करोनाची लागण झाली असून बाधित बालकांच्या संख्येत ३.३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ११ वर्षांवरील बालकांमध्ये संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात या वयोगटातील १८ हजार ४१३ बालके बाधित झाल्याचे आढळले असून बाधित बालकांच्या संख्येत चार टक्क्यांनी वाढ झाली आहे.

राज्यात आत्तापर्यंत २० वर्षांखालील ६ लाख ८८ हजार २१८ बालके बाधित झाली आहेत. गेल्या महिनाभरात एकूण २५,१५१ बालकांना नव्याने करोनाची बाधा झाली आहे.

आठवडय़ाभरात ३२८५ बालके बाधित

गेल्या आठवडय़ात १० वर्षांवरील ८६५ तर ११ वर्षांवरील २४२० बालकांना करोना झाला. राज्यात दहा वर्षांखालील २ कोटी १५ बालके असून आत्तापर्यंत यातील २ लाख ०६ हजार ७५६ बालकांना करोना संसर्ग झाला आहे. त्यामुळे एकूण बालकांपैकी बाधित होण्याचे प्रमाण अवघे ०.९६ टक्के आहे.

११ वर्षांवरील २.२३ टक्के बालके बाधित

राज्यात ११ ते २० वयोगटातील मुलांची संख्या २ कोटी १६ लाख आहे. आत्तापर्यंत यातील ४ लाख ८१ हजार ४६२ जणांना लागण झालेली आहे. या वयोगटातील एकूण बाधितांचे प्रमाण २.२३ टक्के आहे. बालकांमध्ये दहा वर्षांखालील बाधित झालेल्या बालकांचे एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत प्रमाण ३.१८ टक्के आहे, तर ११ वर्षांवरील मुलांचे ७.४२ टक्के आहे. एकूण रुग्णसंख्येमध्ये आत्तापर्यंत १० टक्के बालकांचा समावेश आहे.

मुंबईत संसर्गात तीन टक्क्यांनी वाढ

मुंबईत एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत १० वर्षांवरील बालकांचे बाधित होण्याचे प्रमाण सुमारे दोन टक्के तर ११ वर्षांवरील बालकांमध्ये ४.६४ टक्के आहे. आत्तापर्यंत १० वर्षांवरील १९ आणि ११ वर्षांवरील ४१ बालकांचा मृत्यू झाला आहे

पहिल्या लाटेमध्ये एकूण रुग्णसंख्येमध्ये १० टक्के बालके बाधित झाली होती. दुसऱ्या लाटेमध्ये हे प्रमाण एखाद्या टक्क्याने वाढले आहे. एकंदरीत संसर्गाचा प्रादुर्भाव झालेल्या बालकांची संख्या तुलनेने फार कमी आहे. मात्र या बालकांच्या संरक्षणासाठी लस सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे येत्या काळात या बालकांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे. त्यात आता र्निबध शिथिल झाल्यावर मुले घराबाहेर पडत आहेत. पालकांसोबत प्रवासही करत आहेत. परिणामी पुढील सणासुदीच्या काळात रुग्णसंख्या आणखी वाढेल, असे मत बालकांच्या करोना कृतिदलाचे प्रमुख डॉ. सुहास प्रभू यांनी व्यक्त केले.

‘पालकांनी घाबरू नये’

बालके बाधित झाली तरी यातील ८० टक्के ही घरीच बरी होणार आहेत. रुग्णसंख्या वाढली तरी यातील ३ ते ४ टक्के बालकांनाच रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येईल, तर १ ते २ टक्के बालकांमध्ये संसर्गाची तीव्रता अधिक असेल. बालकांसाठी सर्व सुविधाही उपलब्ध केलेल्या आहेत. त्यामुळे पालकांनी घाबरून जाऊ नये, असे डॉ. प्रभू यांनी सांगितले.

बालकांमध्ये ताप, अंगदुखी, डोकेदुखी, घसा खवखवणे, सर्दी किंवा नाक चोंदणे, चव आणि वास जाणे, खोकला ही लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात.

 

राज्यातील बाधित बालकांची आकडेवारी

ते १०                             ११ ते २०

३१ जुलै २०२१   २,००,०१८       ४,६३,०४९

६ सप्टेंबर २०२१ २,०६,७५६       ४,८१,४६२

 

 

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Number of covid 19 infected children in the maharashtra increased by four percent zws