२०१३.. ९६
२०१४.. ११४
डेंग्यूच्या रोगाने मुंबईत थैमान घातले असून गेल्यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत यंदा नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ातच डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. चालू महिन्यातच डेंग्यूचे पाच बळी गेले आहेत.
डेंग्यूच्या रुग्णांची संख्या गेल्यावर्षीपेक्षा यंदा कमी असल्याचा दावा पालिका करत असली, तरी आकडेवारी याला छेद देणारी आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत डेंग्यूचे ९६ रुग्ण आढळले होते. मात्र २०१४ मध्ये नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ापर्यंतच डेंग्यूच्या ११४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शहरात सर्वत्र डेंग्यू धुमाकूळ घालत असताना पालिका करत असलेली उपाययोजना अपुरी पडत असल्याचे दिसत आहे. याउलट, नागरिक स्वच्छतेबाबत जागरूक नसून पालिकेच्या स्वच्छता मोहिमेला सहकार्य करत नसल्याची पालिकेच्या आरोग्य विभागाची तक्रार आहे. यंदा डेंग्यूची लागण डॉक्टरांनाही होऊन केईएम रुग्णालयातील एक निवासी डॉक्टर मरण पावली, ही गोष्ट या रोगाचे गांभीर्य वाढवणारी ठरली आहे. डेंग्यच्या साथीने आजवर १८ जणांचा बळी घेतला आहे.