लोकल प्रवासासाठी असलेले निर्बंध आणखी शिथिल करण्यात आल्याने सोमवारी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवरील प्रवासी संख्या ६० लाखांहून अधिक नोंदवण्यात आली. करोनापूर्व काळात लोकलमधून सरासरी ७५ ते ८० लाख प्रवासी दररोज प्रवास करत होते. त्या तुलनेत सोमवारची प्रवासी संख्या ८० टक्क््यांवर पोहोचली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत लोकलमधील प्रवासी संख्या करोनापूर्व काळातील आकडा गाठेल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, दोन लसमात्रा घेतलेल्या सामान्य प्रवाशांना आणि १८ वर्षांखालील मुलांना मासिक पास देण्यात येत असून ११ ऑगस्टपासून आतापर्यंत २२ लाखांहून अधिक पास दिल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. 

अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा असताना आता दोन लसमात्रा घेतलेल्या सामान्य नागरिकांनाही लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. सामान्य प्रवाशांना फक्त मासिक पास देण्यात येत आहे. १८ वर्षांखालील मुलांचेही लसीकरण झाले आहे असे समजून त्यांनाही दसऱ्यापासून लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्याबरोबरच महत्त्वाच्या वैद्यकीय कारणांसाठी लोकल प्रवास करू इच्छिणाऱ्यांनाही डॉक्टरांकडून प्रमाणपत्र घेऊन तिकीट खिडक्यांवर मासिक पास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे लोकल गाड्यांना सकाळी व सायंकाळी हळूहळू गर्दी वाढू लागली आहे. मध्य व पश्चिाम उपनगरीय रेल्वेवरील १८ ऑक्टोबर रोजी दैनंदिन एकू ण प्रवासी संख्या ६० लाख १७ हजार ८२० इतकी नोंदविली गेली. यामध्ये मध्य रेल्वेवरील ३२ लाख ५५ हजार ९७७, तर पश्चिाम रेल्वेवर २७ लाख ६१ हजार ८४३ प्रवाशांचा समावेश आहे. १ ऑक्टोबर रोजी पश्चिाम रेल्वे उपनगरीय प्रवासी संख्या १६ लाख ४६ हजार आणि मध्य रेल्वे उपनगरीय प्रवासी संख्या २० लाख ८२ हजार इतकी होती. यात आता प्रचंड वाढ झाली आहे.

२२ लाख मासिक पासची विक्री

दोन लसमात्रा घेतलेल्या सामान्य प्रवाशांना ११ ऑगस्टपासून, तर दसऱ्यापासून १८ वर्षांखालील नागरिकांनाही मासिक पास देऊन लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण २२ लाख २५ हजार ६११ जणांना मासिक पास देण्यात आला आहे. पश्चिाम रेल्वेवर एकू ण सहा लाख ८२ हजार ४७६ आणि मध्य रेल्वेवर १५ लाख ४३ हजार १३५ मासिक  पास वितरित झाले आहेत. सोमवारी एकाच दिवशी मध्य रेल्वेवर तब्बल ५१ हजार ९४९, तर पश्चिाम रेल्वेवर ३० हजार ३५८ मासिक पास देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अ‍ॅपद्वारे तिकीट बंदच

अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांनाच लोकलचे तिकीट दिले जाते.  प्रवासी संख्या वाढत असल्याने तिकीट खिडक्यांवर गर्दीही होऊ लागली आहे. त्यातच मोबाइल अ‍ॅप, एटीव्हीएम आणि जनसाधारण तिकीट सेवाही बंद आहेत.

मोबाइल चोरीची  २४ प्रकरणे

लोकल गाड्यांना जसजशी गर्दी वाढत आहे, तसतसे रेल्वेच्या हद्दीतील गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे. सोमवारी मोबाइल चोरीच्या २४ गुन्ह्यांची नोंद झाली. आता पाकीट आणि बॅग चोरींच्याही प्रकारांमध्ये वाढ झाली आहे.