मुंबई : देशातील परिचारिका महाविद्यालयांतील अनेक जागा रिक्त राहिल्याने भारतीय परिचर्या परिषदेने (आयएनसी) परिचारिका प्रवेशासाठी असलेले पात्रता निकष पुन्हा शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे एएनएम, जीएनएम, बीएस्सी नर्सिंग, एमएस्सी नर्सिंगसह सर्व परिचारिका अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरवरून १५ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. या निर्णयांमुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र पात्रता निकष किती पर्सेंटाइलपर्यंत कमी करण्यात येणार आहे, याबाबत कोणतीही स्पष्टता दिलेली नाही.
देशातील विविध परिचारिका महाविद्यालयांमधील अनेक जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे राज्यातील सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून किमान पात्रता निकष कमी करण्याची मागणी परिषदेकडे करण्यात आली होती. राज्यभरातून आलेल्या मागणीची दखल घेत परिषदेने २०२६-२७ या शैक्षणिक सत्रात सीईटी परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी पात्रता निकष शिथिल करून रिक्त जागा भरण्यास मान्यता दिली आहे. यापूर्वी १६ ऑक्टोबर रोजी परिषदेने पात्रता निकष कमी केले होते. त्यानुसार खुल्या प्रवर्गासाठी किमान निकष असलेले ५० पर्सेंटाईल हे ४० पर्सेंटाईल, तर दिव्यांगांसाठी ३५, तर राखीव प्रवर्गासाठी ३० पर्सेंटाइलपर्यंत शिथिल करण्यात आले होते.
नव्याने पात्रता निकष कमी करण्याबाबत परिषदेने निर्देश दिले असले तरी पात्रता पर्सेंटाइल कितीपर्यंत कमी करण्यात येणार आहे, याचा स्पष्ट उल्लेख अधिसूचनेत करण्यात आलेला नाही. त्यामुळे पात्रता निकषाबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र पात्रता निकष शून्य करण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पात्रता निकष शून्य केल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना परिचारिका अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
परिचारिका अभ्यासक्रमांना १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
परिचारिका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत होती. मात्र पात्रता निकष शिथिल करण्याबाबत घेतलेल्या निर्णयामुळे परिषदेने एएनएम, जीएनएम, बीएस्सी नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएस्सी नर्सिंग, एमएस्सी नर्सिंग, पीएच.डी. नर्सिंग, पोस्ट बेसिक डिप्लोमा आणि नर्स प्रॅक्टिशनर या सर्व नर्सिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार १५ नोव्हेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
बीएस्सी नर्सिंगसाठी दोन स्वतंत्र बॅच
बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाचे वर्ग सत्रनिहाय पद्धतीने होत असल्याने प्रवेशासाठी मुदतवाढ दिलेल्या कालावधीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वर्ग घेण्यात येणार आहे. त्यानुसार ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा नियमित वर्गामध्ये समावेश होईल, तर १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्वतंत्र वर्गात समावेश करण्यात येणार आहे. या दोन्ही वर्गाच्या परीक्षा स्वतंत्रपणे घेण्यात येणार आहेत.
नियमभंग करणाऱ्या संस्थांवर कारवाई
महाविद्यालयांना मंजूर असलेल्या वार्षिक प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही. तसेच प्रवेशाच्या अंतिम मुदतीत यापुढे कोणतीही वाढ केली जाणार नाही. अंतिम तारखेनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेशास परवानगी दिली जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर तसेच त्यांच्या व्यवस्थापनावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही भारतीय परिचर्या परिषदेने दिला आहे.
