मुंबई : वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या राज्य कोट्यांतर्गत रिक्त राहिलेल्या १३८ जागांसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) विशेष प्रवेश फेरी राबविण्यात येणार आहे. या फेरीसाठी पात्र विद्यार्थ्यांना नव्याने नोंदणीची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. त्यानुसार, ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.
वैद्यकीय व दंत
अभ्यासक्रमाच्या जागा रिक्त राहिल्याने राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या वैद्यकीय समुपदेशन समितीने (एमसीसी) विशेष मुक्त फेरी राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार या फेरीचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. राज्यात रिक्त राहिलेल्या राज्य कोट्यांतर्गत जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय सीईटी कक्षाने घेतला आहे. या विशेष मुक्त फेरीसाठी राज्य काेट्यातून पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना नव्याने नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ही प्रवेश प्रक्रिया ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या फेरीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासाठी २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
नोंदणी शुल्क त्याच दिवशी सायंकाळी ७.३० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. तसेच रात्री ८ पर्यंत विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व मूळ कागदपत्रांच्या रंगीत स्कॅन प्रती प्रवेश पोर्टलवर अपलोड करायच्या आहेत. कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी ३ नोव्हेंबरपर्यंत करण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेचे पुढील वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे. तसेच जागा रिक्त राहिल्यास आणखी एक मुक्त फेरी राबविली जाण्याची शक्यता आहे.
यापूर्वी नोंदणी केलेल्यांना पुन्हा संधी नाही
या नव्या नोंदणी प्रक्रियेसाठी काही पात्रता अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. यापूर्वीच नोंदणी केलेल्या उमेदवारांना पुन्हा नोंदणी करता येणार नाही. एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या दुसऱ्या फेरीत जागा मिळाल्यानंतरही प्रवेश न घेतलेले, संबंधित संस्थेत हजर न झालेले किंवा मिळालेला प्रवेश रद्द केलेले उमेदवार नव्याने नोंदणी करू शकतील. मात्र, त्यांनी तिसऱ्या फेरीसाठी यापूर्वी नोंदणी केलेली नसणे आवश्यक आहे. तिसरी फेरी किंवा त्यानंतरच्या कोणत्याही मुक्त फेरीमध्ये जागा मिळालेल्या उमेदवारांना नव्याने नोंदणी करता येणार नाही.
प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रवेश प्रक्रियेचा टप्पा –
अंतिम तारीख व वेळ ऑनलाइन नोंदणी व सत्र अर्ज
– २ नोव्हेंबर, सायंकाळी ५.३० ऑनलाइन नोंदणी शुल्क भरणे – २ नोव्हेंबर, सायंकाळी ७.३० मूळ आवश्यक कागदपत्रांच्या रंगीत स्कॅन प्रती अपलोड करणे – २ नोव्हेंबर, रात्री ८ ऑनलाइन कागदपत्र पडताळणी – ३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत
