मुंबई : विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता परिचारिका संवर्गातील प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. बीएस्सी नर्सिंग, सामान्य परिचर्या व प्रसाविका (जीएनएम), सार्वजनिक आरोग्य परिचारिका (पीएचएन), मनोरुग्ण तज्ज्ञ परिचारिका (डीपीएन) या अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेश नोंदणीला २४ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. अर्ज नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना एक महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून, २४ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागातंर्गत चालवण्यात येणाऱ्या परिचारिका संवर्गातील अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राज्य सामाईक प्रवेश कक्षामार्फत राबवण्यात येते. राज्यामध्ये बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी १६ हजार ५३० जागा आहेत. तर सामान्य परिचर्या व प्रसाविकाच्या ९६०, सार्वजनिक आरोग्य परिचारिका अभ्यासक्रमाच्या ३० आणि मनोरुग्ण तज्ज्ञ परिचारिका या अभ्यासक्रमाच्या ४० जागा आहेत. या सर्व जागांसाठी सीईटी कक्षाकडून शनिवारपासून अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. अभ्याक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना २४ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

बीएस्सी नर्सिंग आणि सामान्य परिचर्या व प्रसाविका या अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा ६ व ७ मे रोजी होणार आहे. तर सार्वजनिक आरोग्य परिचारिका आणि मनोरुग्ण तज्ज्ञ परिचारिका अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा ५ मे रोजी होणार आहे. बीएस्सी नर्सिंग, सामान्य परिचर्या व प्रसाविका या अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर होणार आहे. तर सार्वजनिक आरोग्य परिचारिका आणि मनोरुग्ण तज्ज्ञ परिचारिका या अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा राज्यातील मुंबई, पुणे, संभाजी नगर व नागपूर या चार परीक्षा केंद्रांवर होणार आहे.

या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज, नोंदणी वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या http://www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.

बीएस्सी नर्सिंगकडे विद्यार्थ्यांचा कल

मागील तीन वर्षांमध्ये बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाला नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाढ होत आहे. २०२३-२४ मध्ये ३१ हजार ३९७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यानंतर २०२४-२५ मध्ये ५८ हजार ६३३ विद्यार्थ्यांनी, तर २०२५ -२६ मध्ये ४७ हजार ५०१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तसेच सार्वजनिक आरोग्य परिचारिका आणि मनोरुग्ण तज्ज्ञ परिचारिका अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी २०२४-२५ मध्ये ४५६ आणि २०२५-२६ मध्ये ४७७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.