मुंबई: राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात आल्या, तर ओबीसींच्या जागांवर ओबीसीच उमेदवार दिले जातील, असा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या पक्षाचे खासदार, आमदार, माजी आमदार व पराभूत उमेदवारांच्या बैठकीत पुढील वर्षांत  होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण रद्द केले आहे. हे आरक्षण पुनस्र्थापित होईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अशी सर्व पक्षांची मागणी आहे. परंतु घटनादुरुस्तीमुळे निवडणुका फार काळ टाळता येणार नाहीत. न्यायालयाने जर, निवडणुका घेण्याचा आदेश दिला, तर अशा परिस्थितीत काय करायचे, त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका निश्चित के ली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्याच, तर ओबीसींच्या रिक्त जागांवर ओबीसीच उमेदवार देण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते  व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्याची सूचना पवार यांनी मंत्री, खासदार, आमदार यांना के ली. त्यानुसार पालकमंत्री, संपर्कमंत्री, आमदार हे तत्काळ आपत्तीग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत, असे मलिक यांनी सांगितले.