उच्च न्यायालयाचे महाधिवक्त्यांना पाचारण
मुंबई : राफेल विमान खरेदी व्यवहारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या निमित्ताने काही कायदेशीर प्रश्न उपस्थित झाल्याचे उच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले. तसेच या प्रकरणी कायदेशीर सहकार्यासाठी राज्याच्या महाधिवक्त्यांना पाचारण केले. राहुल यांच्याविरोधात भाजप कार्यकर्ता महेश श्रीश्रीमल यांनी गिरगाव न्यायालयात बदनामीची फौजदारी तक्रार दाखल केली आहे. गिरगाव न्यायालयानेही या तक्रारीची दखल घेऊन राहुल यांच्याविरोधात फौजदारी कार्यवाही सुरू करण्याचे आणि त्यांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते.




त्याविरोधात, राहुल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाने यापूर्वीच राहुल यांना बजावण्यात आलेल्या समन्सला अंतरिम स्थगिती दिली आहे. राहुल यांनी कनिष्ठ न्यायालयाने सुरू केलेली कारवाईही रद्द करण्याची मागणी केली आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या एकलपीठासमोर या प्रकरणी बुधवारी सुनावणी झाली. त्या वेळी या याचिकेच्या निमित्ताने काही कायदेशीर प्रश्न निर्माण होत असल्याचे न्यायालयाने म्हटले. तसेच या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी कायदेशीर सहकार्य करणे आवश्यक आहे, असे नमूद केले.