मुंबई : राज्यातील निम्म्या प्रदेशातून मोसमी पावसाने माघार घेतल्याची घोषणा शनिवारी हवामान विभागाने केली. मागील दोन दिवसांपासून बहुतांश भागात कमाल तापमान ३ ते ४ अंशांनी वाढ झाली असून यात कोकण प्रदेशात उष्ण आणि दमट वातावरणामुळे नागरिकांना उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाच्या दीर्घकालीन अंदाजानुसार, ऑक्टोबर महिन्यात संपूर्ण देशात कमाल तापमान सरासरीहून अधिक राहील, अशी शक्यता व्यक्त केली असून त्यामुळे राज्यातही ऑक्टोबर तापदायक ठरण्याची चिन्हे आहेत.

राज्यात सप्टेंबर महिन्यात पावसाने प्रमाण सरासरीहून कमीच राहिले. त्यामुळे सप्टेंबरच्या अखेरीस राज्यातील काही भागात उकाड्यात वाढ झाली होती. दरम्यान, प्रशांत महासागरतील ‘एल निनो’ स्थिती ऑक्टोबरपासून अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यंदाच्या हिवाळ्यातही ”एल निनो” स्थितीचा प्रभाव जाणवेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राज्यात ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचा दाह वाढला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात सरासरीहून २ ते ३ अंश अधिक कमाल तापमान नोंदले जात आहे. त्यामुळे यंदा कमी पावसामुळे आधीच दुष्काळाचा सामना करणाऱ्या बहुतांश जिल्ह्यतील नागरिकांच्या समस्यांमध्ये आणखीन भर पडली आहे. पुढील चार दिवसात राज्यातील कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होईल तर पुढील तीन दिवस कोकण प्रदेशातील कमाल तापमान ३५ ते ३७ अंशांच्या दरम्यान राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी पारा ३७ अंशावर

मुंबईत शुक्रवारी ४६ वर्षांनी ऑक्टोबर महिन्यातील कमाल तापमानात वाढ नोंदली गेली. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी ३७. ४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती जे सरासरी कमाल तापमानाहून ५.६ अंश सेल्सिअसने अधिक होते. दरम्यान, शनिवारीही मुंबई शहर आणि उपनगरात उष्णता कायम होती. उष्ण आणि दमट वातावरणामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शनिवारी ३६.५ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ केंद्रात ३७.४ अंश सेल्सिअल कमाल तापमानाची नोंद झाली जे सरासरी कमाल तापमानहून ५ अंशांनी अधिक होते.

कोकणात आज उष्णतेचा ‘यलो अलर्ट’

कोकण प्रदेशात शुक्रवारपासून कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईसह संपूर्ण कोकण प्रदेशात सध्या नागरिकांना उष्ण आणि दमट वातावरणाचा त्रास सहन करावा लागत आहे. रत्नागिरी येथे शुक्रवारी ३८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले जे सरासरी कमाल तापमानहून ७ अंशांनी अधिक होते. रत्नागिरीच्या मागील १४३ वर्षांच्या हवामान नोंदीनुसार हे ऑक्टोबर महिन्यातील आतापर्यंतचे सर्वाधिक कमाल तापमान होते तर शनिवारीही तेथे ३७.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. तसेच डहाणू येथे ३७.९ तर हर्णे येथे ३५.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, रविवारीही पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. मोसमी वाऱ्यांचा प्रभाव कमी झाला असून पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे विशेषतः कोकण प्रदेशात कमाल तापमानात वाढ झाली आहे. मुंबईतही सरासरीहून अधिक कमाल तापमानाची नोंद होत आहे, असे कुलाबा येथील हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले.