जकात चुकवून २७ कोटी रुपयांचे हिरे नेण्याचा प्रयत्न महापालिकेच्या दक्षता पथकाने शुक्रवारी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर हाणून पाडला. हे हिरे तात्काळ जप्त करून त्यावरील २.९९ लाख रुपये जकात वसूल करण्यात आली.
जयपूर-मुंबई रेल्वेगाडीतून मुंबईत मोठय़ा प्रमाणावर हिरे आणण्यात येणार असल्याची माहिती दक्षता विभागाला मिळाली होती. त्यानुसार दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी पहाटेपासून पाळत ठेवली होती. या गाडीतून आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांच्याकडील दोन बॅगा रेल्वे स्थानकाबाहेर उभ्या असलेल्या गाडीत ठेवल्या. हे वाहन रेल्वे स्थानकाबाहेर येताच दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहन थाबविले आणि आतील व्यक्तींना हटकले. झडतीमध्ये बॅगांमध्ये २७ कोटी रुपयांचे हिरे असल्याचे वाहनचालकाने अधिकाऱ्यांना सांगितले. दक्षता अधिकाऱ्याच्या (विशेष कार्य) समक्ष बॅग उघडण्यात आली असता त्यात २७ कोटी २४ लाख, ९२ हजार रुपयांचे हिरे आढळून आले. या हिऱ्यांवर नियमानुसार २ लाख ९९ हजार ७३९ जकात त्वरित वसूल करण्यात आली.