|| निशांत सरवणकर
मुंबई : बीडीडी चाळ प्रकल्पाचे याआधीच भूमिपूजन झालेले असताना आता महाविकास आघाडी सरकारने पुन्हा भूमिपूजन करण्याचे ठरविले आहे. मंगळवारी होणाऱ्या भूमिपूजनामुळे श्रेयाचे राजकारण पुन्हा उफाळण्याची चिन्हे आहेत.

वरळी येथील बीडीडी चाळवासीयांच्या थेट पुनर्वसनाच्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन २७ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. बीडीडी चाळींच्या रखडलेल्या पुनर्विकासास फडणवीस सरकारनेच हिरवा कंदिल दाखविला. त्यासाठी म्हाडावर जबाबदारी सोपविण्यात आली.

म्हाडाच्या इतिहासात पहिल्यांदाचा एल अँड टी (नायगाव), शापुरजी पालनजी (ना. म. जोशी मार्ग) आणि टाटा-कॅपिसिट कन्स्ट्रक्शन (वरळी) अशा बड्या विकासकांची  कंत्राटदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात नायगाव प्रकल्पाचे काम स्थानिकांच्या विरोधामुळे सुरूच होऊ शकले नाही. ना. म. जोशी मार्ग येथे २७४ रहिवाशांचे म्हाडाच्या संक्रमण शिबिरात स्थलांतर करण्यात आले तर वरळीत संक्रमण शिबिराचे काम सुरू करण्यात आले.

२१ एप्रिल २०१७ रोजी नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ वरळीच्या जांबोरी मैदानावर फडणवीस यांच्या हस्ते झाला होता. त्यावेळी वरळी बीडीडी चाळ प्रकल्पातील पुनर्वसनाच्या प्रस्तावीत इमारतीच्या भूखंडाची पूजा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली होती. वरळी येथील प्रकल्पासाठी ३ एप्रिल २०१७ रोजी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली होती. वरळीतील पोलीस मैदानावर संक्रमण शिबिराचे काम सुरू करण्यास कार्यादेश देण्यात आला. त्यानुसार संक्रमण शिबिराचे काम जोरात सरू झाले होते. जवळपास ५०० पाईलिंग खोदण्यात आले. मात्र राज्यात सत्ताबदल झाला आणि २२ मजली संक्रमण शिबिराचे बांधकाम थांबविण्यात आले. महाविकास आघाडी सरकारने संक्रमण शिबिराऐवजी पुनर्वसनाच्या इमारती बांधण्याचा निर्णय घेतला. आता त्याच बांधकामाचे भूमिपूजन होणार आहे.

गेल्या सरकारने तीन-चार वर्षांत या प्रकल्पात काहीच प्रगती केली नाही. वरळी येथे थेट पुनर्वसनाच्या इमारतींच्या बांधकामांना सुरू वात करण्यात येणार आहे. संक्रमण शिबिराऐवजी थेट हक्काच्या घरात रहिवाशांना जाता येईल. दक्षिण आशियाईतील हा सर्वांत मोठा नागरी पुनर्विकास प्रकल्प असून तो लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

 – जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री

बीडीडी चाळ पुनर्विकासाची मुहूर्तमेढ भाजप सरकारने रोवली. मात्र महाविकास आघाडी सरकारने सुरू झालेले काम बंद केले. अशी भूमीपूजने दहा करा, पण कामाला सुरुवात करा. या प्रकल्पात असलेल्या अडचणी सोडविण्याऐवजी विनाकारण काम थांबविण्यात आले आहे.  – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते