मुंबई : वेष्टनाचे कथित उल्लंघन आणि मद्याच्या परिपक्वतेबाबतच्या दाव्यांवरून राज्यात ‘ओल्ड मॉन्क` रमच्या विक्रीवरील बंदीच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती देण्यास नकार दिला. तथापि, वेष्टनावरील ‘७ इयर्स ओल्ड ब्लेंडेड’ आणि ‘व्हेरी ओल्ड व्हॅटेड’ यासारख्या वर्णनांवर न्यायालयाने प्रश्न उपस्थित केल्यानंतर आणि असे दावे ग्राहकांची दिशाभूल करू शकतात, असे निरीक्षण नोंदवल्यावर कंपनीने हे वर्णन बदलण्याची तयारी दाखवली.
वेष्टनावरील ‘७ इयर्स ओल्ड ब्लेंडेड’ हा मजकूर काढून टाकण्यास आणि ‘अॅडेड फ्लेव्हर’ ठळकपणे प्रदर्शित करण्यास तयार असल्याचे उत्पादक मोहन रॉकी स्प्रिंगवॉटरने न्यायालयाला सांगितले. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने त्याची दखल घेऊन कंपनीला डिजिटल पद्धतीने छापलेला नवीन वेष्टनाचा मसुदा पुढील सुनावणीच्या वेळी सादर करण्याचे आदेश दिले.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) काढलेल्या आदेशांला कंपनीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. कथित वेष्टन नियमांचे पालन न करणे आणि कृत्रिम स्वादयुक्त पदार्थांच्या वापरामुळे राज्यात ओल्ड मॉन्कच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. सुनावणीच्या वेळी, संपूर्ण मद्य सात वर्षे परिपक्व झाले आहे, असा विश्वास सामान्य ग्राहक ठेवू शकतो, याबद्दल खंडपीठाने चिंता व्यक्त केली. तुम्ही जनतेची दिशाभूल करत आहात. ७ इयर्स ओल्ड म्हणजे सात वर्षे जुनी, अशी टिप्पणी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती घुगे यांनी केली.
वैधानिक नियमांनुसार, वेष्टनावर ब्लेंडेड स्पिरिट्स वेगळे दर्शवले होते, असे याचिकाकर्त्यांच्या वतीने वरिष्ठ वकील नवरोज सिरवई यांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर, सामान्य ग्राहकाला असे तांत्रिक फरक समजतील का ? या देशातील प्रत्येक नागरिक इतका सुशिक्षित असता तर किती बरे झाले असते, त्याला हे सर्व समजले असते, असा टोलाही न्यायालयाने हाणला. अतिरिक्त स्वादवर्धकांची माहिती कशी उघड केली गेली यावरही न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला. उत्पादनाच्या पॅकेजिंगची तपासणी केल्यानंतर, आपण भिंग वापरून पाहिले, तरी आपल्याला ती माहिती सापडली नसल्याचेही न्यायालयाने सुनावले. तथापि, एफएसएसएआय नियमांनुसार न्यूट्रल स्पिरिट्समध्ये मान्यताप्राप्त स्वादवर्धक पदार्थांना परवानगी आहे आणि सर्व घटक उघड केले गेले होते. त्यानंतरही ओल्ड मंकवर निवडक कारवाई केल्याचा आरोप कंपनीतर्फे करण्यात आला.
दुसरीकडे, अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंग यांनी याचिकेला विरोध केला आणि रमला त्याची वैशिष्ट्यपूर्ण चव आणि सुगंध नैसर्गिकरित्या उसाच्या आंबवण्याच्या प्रक्रियेतूनच मिळाला पाहिजे, असा युक्तिवाद केला. उत्पादनात न्यूट्रल स्पिरिट्सचा मोठा भाग असतो, तेव्हा त्याचे रम म्हणून विपणन केल्यास ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते, असेही सिंग यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर, कंपनीने उत्पादकाने पॅकेजिंगमध्ये बदल करण्यास सहमती दर्शवली.
