मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या दहापदरीकरणानंतर आता जुना महामार्ग सहापदरी करण्याचा घाट महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घातला आहे. त्याअनुषंगाने सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम एमएसआरडीसीने हाती घेतले आहे. या सहापदरीकरणासाठी ५ ते ६ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा खर्च वसूल करण्यासाठी पथकर वसुलीच्या कालावधीत १० ते १५ वर्षांनी वाढ केली जाण्याची शक्यता आहे.
लोणावळा आणि खंडाळा घाट पार करण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे रुंदीकरण प्रकल्पाअंतर्गतच लोणावळा आणि खंडाळा घाट वगळून वाहतूक अधिक जलद करण्यासाठी नवीन रस्ते, मार्ग बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी जुन्या मुंबई-पुणे चौपदरी महामार्गाचे सहापदरीकरण करण्यात येणार आहे, तर आवश्यकतेनुसार महामार्गात बदलही केले जाणार आहेत. यासाठी सविस्तर आराखडा सल्लागाराच्या माध्यमातून तयार केला जात आहे. हा आराखडा तयार झाल्यानंतर प्रकल्प नेमका कसा असेल, हे स्पष्ट होईल, असे एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
ब्रिटिश काळात मुंबई आणि दख्खन पठाराला जोडण्यासाठी बोरघाटातून घाटरस्ता विकसित करण्यात आला. पुढे हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून विकसित झाला आणि त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ म्हणून तो विकसित करण्यात आला. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग सेवेत दाखल होईपर्यंत मुंबई-पुण्याला जोडणारा हाच प्रमुख रस्ता होता. २०१० मध्ये हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग ४८ चा भाग झाला. हा महामार्ग अंदाजे १५० ते १५६ किमी लांबीचा असून सुरुवातीला तो दुपदरी होता. वाढत्या वाहनांच्या पार्श्वभूमीवर महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. या महामार्गाच्या देखभाल-दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी एमएसआरडीसीवर आहे.
६ हजार कोटी खर्च अपेक्षित
प्रकल्पासाठी ५ ते ६ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पाचा खर्च पथकराच्या माध्यमातून वसूल केला जाणार आहे. सध्या जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पथकर वसुलीसाठी २०३५ पर्यंत मुभा देण्यात आली आहे. मात्र, आता हा कालावधी १० ते १५ वर्षांनी वाढविला जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार २०४५-२०५० पर्यंत या महामार्गावर पथकर वसूल केला जाईल.
