ब्राह्मोस या भेदक क्षेपणास्राची चाचणी अरबी समुद्रात करण्याचा निर्णय भारतीय नौदलातर्फे झाल्यानंतर त्यासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनाही आमंत्रित करण्याचा निर्णय झाला. भारताच्या दृष्टीने ही घटना अतिमहत्त्वाची होती. म्हणूनच पंतप्रधानांसमोर त्याचे सादरीकरण गोव्यानजिक अरबी समुद्रात होणार होते. त्यासाठी संरक्षण पत्रकारांचा एक निवडक ताफा मुंबईहून आणि एक ताफा नवी दिल्लीहून येणार होता. मुंबईच्या ताफ्यात ‘लोकसत्ता’तर्फे माझा समावेश होता. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि संरक्षण पत्रकारांसाठी यजमान युद्धनौका होती, आज प्रदीर्घ सेवेनंतर समारंभपूर्वक निवृत्त होत असलेली ‘आयएनएस विराट’.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जनशताब्दीने मुंबईहून निघून आम्ही सहा निवडक पत्रकार गोव्याला पोहोचलोदेखील. दुसऱ्या दिवशी पहाटेस निघून समुद्रात असलेल्या ‘आयएनएस विराट’वर पोहोचायचे होते. ठरल्याप्रमाणे पहाटे चार वाजता नौदलाचे वाहन आले आणि एका फ्रिगेटवरून आम्ही अरबी समुद्रात रवाना झालो. विराटवर पोहोचेपर्यंत दुपार झाली होती. एका युद्धनौकेतून दुसऱ्या आणि त्यातही ती ‘आयएनएस विराट’सारखी अधिक उंची असलेली विमानवाहू युद्धनौका असेल तर सर्वजण एका युद्धनौकेतून दुसऱ्या युद्धनौकेवर जाण्यास तासाचा अवधी तरी लागतोच. ती कसरत पूर्ण करून, हो ती कसरतच असते. भर समुद्रात केवळ एका चिंचोळ्या पट्टीकेवरून पलीकडच्या युद्धनौकेवर जाणे वाटते तितके सोपे नसते.
विराटवर पोहोचलो आणि प्रत्येकाला एक जोडीदार देण्यात आला. एका बंक केबिनमध्ये दोन जण अशी सोय होती. माझ्या सोबतीचा दिल्लीचा एक पत्रकार होता, तो सतत सिगारेट ओढत होता. अर्ध्या तासातच मी हैराण होऊन तिथून बाहेर पडलो. मागच्या बाजूस असलेल्या एका गोलाकार खिडकीच्या इथे पोहोचलो. केवळ मागे जाणाऱ्या लाटा पाहात आणि फोटो काढत अर्धातास घालवला, मग पुन्हा त्या बंक केबिनमध्ये आलो तेव्हा तिथे गॅस चेंबरच झालेले होते. त्या पत्रकाराकडे रागाने एक कटाक्ष टाकत सॅक उचलली, त्याने दिल्लीकरांच्या गुर्मीने माझ्याकडे दुर्लक्ष्य केले. बाहेर पडलो आणि नौदलाच्या अधिकाऱ्यांना शोधत होतो तोच पंतप्रधानांच्या संरक्षणार्थ तिथे असलेला एनएसजीचा प्रमुख समोर आला. म्हणाला, अरे, आपको अभितक रूम नही मिला. मी त्याला घटनाक्रम सांगितल्यावर तो म्हणाला, अरे सर फिर इतने सालोंकी दोस्ती क्या कामकी. असे म्हणत हाताला पकडून स्पेशल सिक्युरिटी झोनमध्ये घेऊन गेला, जिथे पंतप्रधानांच्या बाजूला एनएसजीची व्यवस्था होती. मी विचार करत होतो, याला मी कधी भेटलोय. काहीच आठवत नव्हते. पण अनेक वर्षांचे मित्र असल्यासारखा तो बोलत होता. तिथली एक छान बंक केबिन त्याने मला दिली. मला म्हणाला, चेंज कर मी येतोच.

मी चक्क हाफ पँट घालून बसलो होतो. त्याचवेळेस तो परत आला म्हणाला, लंच नही हुआ होगा आपका. मी म्हटले आज उपवास आहे. गुरुवार होता तो. घरी सगळेच गुरुवार करायचे म्हणून शाळेत असल्यापासून मीही करायचो. तो म्हणाला, थांब मी सुकामेवा पाठवतो. सहज पुस्तक वाचत बसलो होतो त्यावेळेस हा परत केबिनच्या दारात म्हणाला, सर को ले आया हूँ. मी म्हटले ओके, तर केबिनच्या दारात थेट पंतप्रधान मनमोहन सिंग. प्रचंड धक्का होता तो माझ्यासाठी. गडबडलो, कसाबसा सावरून बेडवरून खाली उतरलो. तो म्हणाला, ये बहोत अर्से से दोस्त है हमारे. हातातला सुका मेवा माझ्या टेबलावर ठेवून त्यांना म्हणाला, सर आप बात किजीए. मै आताहूँ. बाहेर दोन कमांडो. विराटवरच्या त्या छोटेखानी केबिनमध्ये असलेल्या एकमेव खुर्चीवर पंतप्रधान बसले. त्यांनी चौकशी केली मी काय करतो, आवड काय काय आहे. संरक्षण केव्हापासून कव्हर करतो आहे. पाच- सात मिनिटेच ते केबिनमध्ये होते. आयुष्यात प्रथमच एवढा गडबडून गेलो होतो. त्यांच्या आवाजातील मार्दव प्रचंड आवडले होते. मग निघताना ते म्हणाले, आपका उपवास है बताया, इससे क्या होगा. मै देखता हूँ. त्यांचा हात हातात घेतला, त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि ते परतले. मी विचार करायला सुरुवात करणार तर तितक्यात हा परतला. हातात फळांची छोटेखानी करंडी. म्हणाला, सर ने भेजी है. मुझे बताया होता. मी त्याला म्हटले, अरे तू त्यांना थेट काय घेऊन आलास. तो म्हणाला, ते पंतप्रधान आहेत हे खरे आहे. पण ते खूप चांगले माणूस आहेत. मी तिथे नव्हतो, त्यांचे काम होते. परतल्यावर कळले भेटलो त्यांना सांगितले तुझ्या गडबडीत होतो. मग मीच त्यांना म्हटले भेटता का माझ्या मित्राला. तर ते म्हणाले, चल आणि इथे आलो.

त्याच दिवशी रात्री साधारणपणे सव्वादहा वाजण्याच्या सुमारास ब्राह्मोसची यशस्वी चाचणी झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी पंतप्रधानांचे भाषण होते, सूर्योदयानंतर लगेचच ‘आयएनएस विराट’वर. म्हणून झोपायला जात होतो, तर हा पठ्ठ्या पुन्हा पंतप्रधानांसोबत हजर. डॉ. सिंग म्हणाले, आपने फल तो खाएना. तोपर्यंत त्या करंडीतील एक सफऱचंद गट्टम झाले आहे हे वर निघालेल्या प्लास्टिकवरून त्यांना लक्षात आले असावे.. हसले आणि मग दोघेही परतले. रात्री परत आला तेव्हा माझ्या फोटोग्राफीच्या छंदाविषयी खूप चर्चा झाली.

ब्राह्मोसची यशस्वी चाचणी होताना टिपलेले छायाचित्र. (छाया – विनायक परब)

दुसऱ्या दिवशी सकाळीच परत हा हजर म्हणाला. सर्वांना तुझा फोटो दाखवलेला आहे. दोन मिनिटांसाठी ये. गेलो तर एनएसजी कमांडो घोळक्याने उभे होते. त्याने माझा परिचय सांगितला, सिक्युरिटी चेक झाल्याचे सांगितले व माझ्याकडे वळून म्हणाला, इतरांसाठी पिवळी लाइन असेल तू पार करू शकतोस. त्या दिवशी मी ‘आयएनएस विराट’वर राजासारखा फिरलो आणि शूटही केले. दुपारनंतर ‘आयएनएस विराट’वरून आम्ही निघालो आणि आणखी एका फ्रिगेटने गोव्याहून मुंबईत परतलो. आज ‘आयएनएस विराट’च्या निवृत्तीच्या निमित्ताने या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आणि क्षणभर पुन्हा एकदा भारावून गेलो; वाटले हा वेगळा अनुभव देणाऱ्या ‘विराट’शी आपले काही नाते आहे. म्हणून आज सायंकाळी होत असलेल्या ‘आयएनएस विराट’च्या निवृत्तीसोहळ्याला जातीने हजर राहणार आहे!

vinayak.parab@expressindia.com
Twitter : @vinayakparab

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oldest serving aircraft carraier ins viraat retiring today
First published on: 06-03-2017 at 11:50 IST