लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई: अनंत चतुर्दशीला शहरातील कायदा आणि सूव्यवस्था राखण्यासाठी २० हजारांहून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय वाहतूक विभागाचे अडीच हजार अधिकारी आणि कर्मचारी वाहतुकीचे नियोजन करणार आहेत. लालबाग गणेश मंडळाच्या सुरक्षेसाठी पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
गणपती विसर्जन व ईद दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी सुमारे २० हजार पोलीस तैनात करण्यात येणार असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त(कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले. १७ सप्टेंबर व १८ सप्टेंबर या दोन दिवशी शहरात ९ अतिरिक्त पोलीस आयुक्त, ४० उपायुक्त, ५६ सहाय्यक पोलीस आयुक्त, ४ हजार पोलीस निरीक्षकांसह २०,५१० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणारआहेत. याशिवाय मेटल डिटेक्टर, श्वान पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथकांच्या माध्यमातूनही संवेदशिल ठिकाणांची नियमित तपासणी करण्यात येत आहे. याशिवाय छेडछाड रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणीध्या वेशातील पोलिस असणार आहेत. त्याच बरोबर शहरात बसवण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवले जाणार याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या १० कंपनी, १५ अतिरिक्त प्लाटून, एक हजार गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. गणपती विसर्जनासाठी लालबागचा राजाच्या मार्गिकेवर पाच हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.
आणखी वाचा-अंधेरी, जोगेश्वरीत अठरा तास पाणी पुरवठा बंद; गुरुवारी व शुक्रवारी पाणी जपून वापरावे लागणार
धोकादायक पूल
धोकादायक पुलावरून गणेश विसर्जन मिरवणूक निघताना जुन्या तशाच धोकादायक पुलावरून १०० पेक्षा अधिक व्यक्ती विसर्जन मिरवणूकी वेळी जाणार नाहीत. विसर्जन मिरवणूक जुन्या तसेच धोकादायक पुलावर थांबणार नाहीत, याची काळजी घेण्याबाबतच्या सूचना गणेश मंडळांना देण्यात आल्या आहेत. मुंबईतील घाटकोपर रेल ओव्हर पूल, करीरोड रेल ओव्हर पूल, चिंचपोकळी रेल ओव्हर पूल, भायखळा रेल ओव्हर पूल, मरिन लाईन्स रेल ओव्हर पूल, सँडहर्स्ट रोड रेल ओव्हर पूल, फ्रेंच रेल ओव्हर पूल, केनडी रेल ओव्हर पूल, फॉकलन्ड रेल ओव्हर पूल, महालक्ष्मी स्टील रेल ओव्हर पूल, प्रभादेवी- कॅरोल रेल ओव्हर पूल, दादर टिळक रेल ओव्हर पूल आदी पुलांचा यात समावेश आहे. याशिवाय अत्यावश्यक वस्तू सोडून इतर वस्तू घेऊन येणाऱ्या अवजड वाहनांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. दक्षिण मुंबईमध्ये प्रवेश करण्यास व रस्त्यावर धावण्यास अनंत चतुर्दशीला सकाळी ११.०० ते दुस-या दिवशी सकाळी ८.०० वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत.