दिवाळीनिमित्त धारावीतील कुंभारांचे चाक गतिमान

‘यंदा दिवाळीत उत्तम प्रतिसाद मिळेल, असा अंदाज बांधून पणत्यांची निर्मिती करण्यात आली आहे.

कुंभारवाडा ग्राहकांनी गजबजला; मागणीत वाढ

मुंबई : गेली दीड वर्षे करोनामुळे मातीमोल झालेल्या कुंभारांच्या व्यवसायाला यंदा दिवाळीत झळाळी मिळाली आहे. मुंबईकरांची पावले धारावीतील कुंभारवाड्याकडे वळू लागली असून पणत्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी एकच गर्दी केली आहे.

संक्रांतीला सुगड, दहीहंडीसाठी मडके, नवरात्रोत्सवात गरबी आणि दिवाळीत पणत्या आदींना मोठी मागणी असते. त्यामुळे सण जवळ आले की धारावीचा कुंभारवाडा गजबजून जातो. मात्र गेल्या वर्षी सर्व सण-उत्सव नियम आणि अटींच्या चौकटीत, तसेच करोनाच्या भीतीदायक वातावरणात साजरे झाल्याने याचा परिणाम कुंभारांच्या व्यवसायावरही झाला.

धारावीतील दिवे केवळ मुंबईच नाही तर परदेशात पोहोचले आहेत. दिवाळीला एक महिना असतानाच हे दिवे अमेरिका, युरोप, दुबई आणि अन्य देशांत रवाना झाले. तर पंधरा दिवस आधी राज्यातील विविध भागांतील किरकोळ विक्रेते येऊन पणत्या घेऊन गेले. सध्या मुंबईतील किरकोळ विक्रेते आणि ग्राहकवर्ग पणत्या खरेदीसाठी येत आहेत.

‘यंदा दिवाळीत उत्तम प्रतिसाद मिळेल, असा अंदाज बांधून पणत्यांची निर्मिती करण्यात आली आहे. निर्बंध शिथिल झाल्याने व्यावसायिकांचा अंदाज खरा ठरला. तुलनेने प्रतिसाद कमी असला तरी व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे,’ अशी भावना येथील उत्पादक व्यक्त करीत आहेत.

एक हजार रुपयांपर्यंतच्या पणत्या

लाल मातीच्या साध्या पणत्या १०० रुपयांना १०० तर नक्षीकाम केलेल्या १५० ते २०० रुपयांना शंभर अशा दरात उपलब्ध आहेत. रंगीबेरंगी, कलाकुसर केलेली पणती प्रतिनग ५ ते २० रुपयांच्या दरम्यान आहेत. दिव्यांची दीपमाळ, विविध प्राण्यांच्या आकाराच्या पणत्या १०० रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

करोनापूर्वकाळाचा विचार केला तर तुलनेने यंदा ७० टक्के व्यवसाय झाला आहे. काहीच हाती नसण्यापेक्षा हे नक्कीच दिलासाजनक आहे.  – नरोत्तम मारू, पणती उत्पादक

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: On the occasion of diwali the wheels of potters in dharavi are turning akp

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या