परमबीर सिंह यांनी प्रकरण दडपल्याचा आरोप

मुंबई : गावदेवी येथील पबमध्ये झालेल्या मारहाणप्रकरणी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आरोपीचे नाव यादीतून काढण्यासाठी आपल्यावर दबाव आणल्याचा आरोप पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी केला होता. त्या पब मारहाणी प्रकरणात आता गावदेवी पोलिसांनी एका आरोपीला मुंबई विमानतळावरून अटक केली आहे.

याप्रकरणी पबवर कारवाई करणाऱ्या डांगे यांनी परमबीर सिंह यांच्याविरोधात पोलीस महासंचालक, मुख्यमंत्री यांना तक्रार केली होती. या तक्रारीप्रकरणी आता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) परमबीर सिंह यांच्याविरोधात खुली चौकशी करत आहे.

गावदेवी येथील डर्टी बन्स पब रात्री उशिरापर्यंत सुरू असल्यामुळे तो बंद करण्यासाठी गावदेवी पोलीस २३ नोव्हेंबर २०१९ रोजी तेथे गेले होते. तेथे दोन गटांमध्ये सुरू असलेल्या मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाई करण्यासाठी गेलेले पोलीस नाईक संतोष पवार यांना मारहाण झाली होती. मारहाण करणाऱ्या दोन व्यक्तींना ताब्यात घेऊन आणले असता त्यांच्या दोन मित्रांनी पोलिसांशी हुज्जत घालून ताब्यात घेतलेल्या एकाला जबरदस्ती गाडीत बसवून पळवण्याचा प्रयत्न केला. पळवून नेणाऱ्या दोघांपैकी एकाला गस्तीवर असलेल्या पोलिसांनी पकडले होते. एक जण गर्दीतून पळून गेला. त्याच्याविरोधात पोलिसांनी देशातील सर्व विमानतळांवर एलओसी जारी केले होते. त्यानुसार सहार विमानतळावरून इमिग्रेशन विभागाने आरोपी सतीश गोपाळ जांगीड (३०) ताब्यात घेऊन गावदेवी पोलिसांना याची माहिती दिली. तो मूळचा राजस्थान येथील रहिवासी आहे. या प्रकरणात जीतू नवलानीसह सहा जणांविरोधात यापूर्वीच आरोपपत्र दाखल केले आहे.

झाले काय?

२०१९ मध्ये घडलेल्या या घटनेनंतर तत्कालीन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक असलेल्या परमबीर सिंह यांनी याप्रकरणी कोणताही संबंध नसतानाही त्यांना एसीबी कार्यालयात बोलावले होते, असा आरोप डांगे यांनी लेखी तक्रारीत केला होता. फेब्रुवारी २०२० मध्ये परमबीर सिंह मुंबई पोलीस आयुक्त झाल्यानंतर त्यांनी या प्रकरणातील आरोपी जीतू नवलानी याच्या सांगण्यावरून डांगे यांना नियंत्रण कक्षात बदली केल्याचा आरोप या पत्रात केला होता. त्या वेळी डांगे यांनी गावदेवी अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर याप्रकरणी टाकलेल्या एका संदेशाची गंभीर दखल घेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी डांगे यांनी फेब्रुवारी महिन्यात पोलीस महासंचालक, मुख्यमंत्री यांना पत्र लिहून परमबीर सिंह यांचे पब मालकाशी असलेले संबंध व त्यांच्यावर टाकण्यात आलेल्या दबावाप्रकरणी, तसेच भष्टाचाराप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  डांगे यांच्या तक्रारीप्रकरणी सिंह यांच्याविरोधात खुली चौकशी करण्याची परवानगी गृह विभागाकडे मागितली होती.