मुंबई : करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत आर्थिक अडचणींत वाढ झाल्याने नकली नोटा चलनात आणण्याच्या उद्योगात उतरलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या कक्ष ८ ने अटक केली. पोलिसांनी त्याच्याजवळून ९५ हजार रुपयांच्या नकली नोटा जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी इरफान शेख (३९) याला अटक केली.
इरफान हा पूर्वी पोलिसांसाठी खबऱ्याचे काम करत असे. तसेच स्थानिक वर्तमानपत्रासाठी काम करत होता. टाळेबंदी काळात आर्थिक अडचणी वाढल्याने त्याने नकली नोटा चलनात आणण्याचे काम सुरू केले होते. इरफान या नकली नोटांचा पुरवठा करण्यासाठी सांताक्रुझ येथील मिलन सबवे येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास येणार होता. याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दीपक सावंत यांना मिळाली होती. त्यानुसार सावंत आणि पोलीस उपनिरीक्षक राजकुमार पोवार यांच्या पथकाने सापळा रचून इरफान याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या खिशात ५०० रुपयांच्या १९० नोटा आणि १०० रुपयांची १ नोट पोलिसांना सापडली. अधिक तपास केला असता या नोटा नकली असल्याचे समोर आले.