शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई : राज्यात झालेल्या एकूण लसीकरणापैकी ४४ टक्के लसीकरण मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये झाले आहे, तर सुमारे एक कोटी नागरिकांची दुसऱ्या मात्रेची नियोजित वेळ उलटून गेली तरी अद्याप ते लसीकरणासाठी आलेले नाहीत.

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात लसीकरण वेगाने होत आहे. असे असले तरी राज्यातील पाच जिल्ह्यांमध्येच बहुतांश लसीकरण आहे. २४ नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार राज्यात एकूण १० कोटी ९२ लाख लसीकरण झाले. यातील सर्वाधिक चार कोटी ८१ लाख लसीकरण मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये झाले आहे. सर्वाधिक म्हणजे १५ टक्के लसीकरण मुंबईत, तर त्याखालोखाल पुणे (१२ टक्के), ठाणे (आठ टक्के), नाशिक (पाच टक्के) आणि नागपूरमध्ये (पाच टक्के) झाले आहे.

राज्यात एक कोटी नागरिकांची दुसऱ्या मात्रेची वेळ उलटून गेली आहे. मात्र ते दुसरी मात्रा घेण्यासाठी आलेले नाहीत. यात ८४ लाख नागरिक कोविशिल्ड, तर १४ लाख कोव्हॅक्सिन लस घेणारे आहेत, असे आरोग्य आयुक्तालयाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले.

नोव्हेंबरमध्ये लसीकरणात घट

आतापर्यंत राज्यात सप्टेंबरमध्ये सर्वाधिक सात लाख ६० हजार लसीकरण झाले असून यानंतर मात्र लसीकरणाचे प्रमाण कमी होत असल्याचे आढळले आहे. परिणामी ऑक्टोबरमध्ये पाच लाख २५ हजार, तर नोव्हेंबरमध्ये (२७ नोव्हेंबपर्यंत) पाच लाख लसीकरण झाले. ऑक्टोबरपासून करोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेला तसा लसीकरणाचे प्रमाणही कमी होत गेले. परिणामी राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पहिली मात्रा ६० टक्क्यांहून अधिक नागरिकांनी घेतली असली तरी दोन्ही मात्रा पूर्ण करणाऱ्यांचे प्रमाण बहुतांश जिल्ह्यांमध्ये ३० टक्क्यांपेक्षाही कमी आहे.

या जिल्ह्यांमध्ये लसीकरण सर्वात कमी

नंदुरबारमध्ये सर्वात कमी लसीकरण झाले असून पहिल्या मात्रेचे ५९ टक्के, तर दुसऱ्या मात्रेचे २९ टक्के लसीकरण झाले आहे. यासह बीड, नांदेड, अकोला, यवतमाळ, लातूर आणि िहगोली या जिल्ह्यांमध्ये तुलनेने कमी लसीकरण झाले आहे.

ठाणे जिल्ह्यात अनेकांचे लसीकरणाकडे दुर्लक्ष

राज्यात ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक १६ लाख ८५ हजार नागरिकांनी पहिली मात्रा घेतलेली नाही. याखालोखाल नाशिक, जळगाव, सोलापूर, अहमदनगर, नांदेड, औरंगाबाद, बीड, यवतमाळ आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये पहिली मात्रा न घेतलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे.