साहित्य-संस्कृती

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे  दिल्या जाणाऱ्या चित्रभूषण आणि चित्रकर्मी पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना चित्रभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी विक्रम गोखले यांनी पुरस्कार स्वरूपात दिल्या गेलेल्या ५० हजार रोख रकमेत ५० हजार रुपयांची भर घालत १ लाखांचा निधी विपन्नावस्थेत असलेल्या चित्रकर्मीच्या मदतीसाठी दिला. तसेच कलाकार, तंत्रज्ञांच्या वाटय़ाला येणाऱ्या खडतर जीवनासाठी महामंडळाने आर्थिक तरतूद करावी अशी विनंती गोखले यांनी के ली.

चित्रपटासाठी आयुष्य वेचलेल्या कलाकारांना अनेकदा दुर्दैवी अवस्थेला सामोरे जावे लागते. अशा वेळी त्यांना आधार देता यावा म्हणून चित्रपट महामंडळासारख्या संस्थांनी मोठय़ा प्रमाणात निधी उभारायला हवा, असा सल्लाही गोखले यांनी दिला. त्या निधीची सुरुवात गोखले यांनी स्वत:पासून केली. आजवर मिळालेले पुरस्कार हे माझ्या कामासाठी असले तरी त्या कामांनी मी समाधानी नाही. आता मला असे काहीतरी करायचे आहे, ज्यामुळे मला समाधान प्राप्त होईल. तसेच सध्या सुरू असलेली चित्रपटाची वाटचाल पाहता मराठी चित्रपटांना कधीच मरण येऊ  शकत नाही, असे गोखले यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले. हा सोहळा सोमवारी प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर येथे पार पडला.

या सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, अभिनेते मोहन जाशी, संगीतकार अशोक पत्की यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्याचे सूत्रसंचालन समीरा गुजर यांनी केले. तसेच चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, संचालिका अभिनेत्री वर्षां उसगावकर, प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार यांसह महामंडळाचे सर्व पदाधिकारी, संचालक, सदस्य आणि चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली.

मान्यवरांचा सन्मान

यावेळी विक्रम गोखले यांच्यासोबत ज्येष्ठ अभिनेत्री- नृत्यांगना लीला गांधी, निर्माते किशोर मिस्किन, अभिनेते भालचंद्र कु लकर्णी, अभिनेत्री सुषमा शिरोमणी, श्रीकांत धोंगडे आदी मान्यवरांना चित्रभूषण पुरस्काराने सन्मानित करून पुरस्कार स्वरूपात ५० हजार रोख रक्कम, मानपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले. तसेच दिग्दर्शक रमेश साळगावकर, नृत्यदिग्दर्शक नरेंद्र पंडित, गायक विनय मांडके , अभिनेत्री सविता मालपेकर, संकलक- निर्माते- दिग्दर्शक संजीव नाईक, ध्वनिलेखक प्रशांत पाताडे, छायाचित्रकार जयवंत राऊत, अभिनेते चेतन दळवी, अभिनेते विलास उजवणे, संकलक दीपक विरकूड आणि विलास रानडे, अभिनेते सतीश पुळेकर, संगीतकार अच्युत ठाकू र, संगीत संयोजक आप्पा वढावकर, अभिनेत्री निर्मात्या प्रेमाकिरण, निर्माते प्रबंधक वसंत इंगळे आदी कलावंत आणि तंत्रज्ञांना चित्रकर्मी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चित्रकर्मीना पुरस्कार स्वरूपात १० हजार रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात आले.