मुंबई : ‘एक देश एक निवडणूक’ म्हणजे लोकसभेबरोबर विधानसभा निवडणुका घेणे, हा मुद्दाच व्यवहार्य नसल्याची टीका काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. एकाच वेळी निवडणुका घेताना इतक्या मोठ्या प्रमाणावर ‘ईव्हीएम’ मशीन आणणार कोठून, त्याचप्रमाणे मनुष्यबळाचेही काय करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

ब्रिटीश संसदीय पद्धतीत कधीही लोकसभा किंवा विधानसभा भंग होऊ शकते. आपण स्वत: १९९६, १९९८ आणि १९९९ या तीन वर्षांत तीनदा लोकसभा निवडणुका लढल्या आहे. याचा अर्थ लोकसभा कोणत्याही वेळी भंग होऊ शकते आणि त्यानंतर उपलब्ध कार्यकाळासाठी वेगळ्या निवडणुका घ्याव्या लागतील, असेही चव्हाण यांनी अधोरेखित केले.

‘एक देश एक निवडणूक’ ही संज्ञा जर्मनीचा हुकूमशहा हिटलरच्या ‘एक देश एक नेता’ या संज्ञेप्रमाणे पंतप्रधान मोदी यांच्याकडून ठासवली जात आहे. याला एकत्रित निवडणूक असेही म्हणता आले असते. केंद्र सरकार अमेरिका-प्रणालीप्रमाणे निवडणूक प्रक्रिया भारतात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी घटनादुरुस्ती केली जाणार असून याला काँग्रेसचा पूर्ण विरोध असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एक देश, एक निवडणुकीमुळे हुकूमशाहीचा धोका’

‘एक देश, एक निवडणूक’ या प्रस्तावामुळे केंद्रात एका पक्षाची हुकूमशाही येईल. या विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी राज्यघटनेतील विविध कलमे तसेच लोकप्रतिनिधी अधिनियमात दुरुस्त्यांची आवश्यकता आहे; परंतु या घटनात्मक सुधारणा देशाच्या संघराज्यीय रचना, प्रादेशिक प्रतिनिधित्व आणि लोकशाही तत्त्वांवर गंभीर परिणाम घडवू शकतात, अशी भीती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली. ‘एक देश एक निवडणुकी’च्या संदर्भात लोकसभा सचिवालयाची समिती सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होती. या समितीसमोर दानवे यांनी सोमवारी हरकती आणि सूचना नोंदवल्या.