scorecardresearch

मुंबईः ट्रामाडॉलच्या तस्करीप्रकरणी सीमाशुल्क विभागाकडून एकाला अटक

आरोपीने टॅमोल-एक्स-२२५ या कॅल्शियम कार्बोनेट गोळ्या असल्याचे जाहिर करून त्याच्या तस्करीचा प्रयत्न केला.

Fake Survey Officer arrested
(प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबईः प्रतिबंधीत ट्रामाडॉलच्या सुमारे साडेदहा लाख गोळ्यांच्या तस्करीचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई सीमाशुल्क विभागाने शनिवारी बंगळुरू येथील एका कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला अटक केली. आरोपीने टॅमोल-एक्स-२२५ या कॅल्शियम कार्बोनेट गोळ्या असल्याचे जाहिर करून त्याच्या तस्करीचा प्रयत्न केला. पण त्यांची निर्यात होण्यापूर्वीच या गोळ्या सीमाशुल्क विभागाने जप्त केल्या. मेसर्स फर्स्ट वेल्थ सोल्युशन्सचे सीओओ बंगळुरूचे रहिवासी गुडिपती सुब्रमण्यम (४९) यांना शनिवारी सकाळी सीमाशुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी याप्रकरणी अटक केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपनीय माहितीच्या आधारे, सीमाशुल्क विभागाने गेल्या महिन्यात निर्यात करण्यापूर्वीच संशयीत गोळ्या ताब्यात घेतल्या होत्या.  सहारच्या एअर कार्गो कॉम्प्लेक्समधून या गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या. दक्षिण सुदान येथील जुबा येथे मेसर्स फर्स्ट वेल्थ सोल्युशन्सने मार्फत या गोळ्या पाठवल्या जात होत्या, असे तपासात उघड झाले. कागदपत्रानुसार टॅमोल-एक्स-२२५ च्या साडेदहा लाख गोळ्यांची २१ पाकिटे असल्याचे जाहीर करण्यात आले होते. चुकीच्या माहितीच्या आधारे गोळ्या पाठवण्या येत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सीमाशुल्क विभागाने २८ फेब्रुवारीला गोळ्या जप्त केल्या. तपासणीसाठी गोळ्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. त्यात जप्त केलेल्या गोळ्या ट्रामाडॉलच्या असल्याचे स्पष्ट झाले. ट्रामाडॉल हे एक वेदनाशामक औषध आहे. त्याचा व्यसनासाठी वापर होत असल्यामुळे एप्रिल २०१८ मध्ये भारतात त्यावर बंदी घालण्यात आली होती.

हेही वाचा >>> मुंबईत पोलंडच्या महिलेवर बलात्कार, दीर्घकाळापासून ब्लॅकमेलही करत होता आरोपी; FIR दाखल

या गोळ्या जप्त केल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्याला चौकशीसाठी बोलवण्यात आले. त्यात चौकशीत सुब्रमण्यम यांचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर सीमाशुल्क विभागाने त्याला अटक केली. आरोपी कंपनीचा सर्व व्यवहार पाहत असे. त्याने ट्रामाडॉल गोळ्या कॅल्शियम कार्बोनेट गोळ्या म्हणून चुकीचे घोषित करून निर्यात करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आहे. आर्थिक फायद्यासाठी तो हे करत होता. यापूर्वीही त्यांनी अशाच पद्धतीने ट्रामाडॉलची परदेशात यशस्वी निर्यात केल्याचे चौकशीदरम्यान सांगितले आहे.

हेही वाचा >>> अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या आईचं निधन

ट्रॅमाडॉलला आयसिसचे फायटर ड्रग्स का म्हणतात?

युद्धात जखमी झाल्यानंतर वेदना शमवून लढण्यासाठी आयसिसचे दहशतवादी ट्रॅमाडॉलचा वापर करायचे. त्यामुळे ट्रॅमाडॉल या गोळ्या इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया अर्थात आयसिसमध्ये  “फायटर ड्रग्स’ म्हणून प्रचलीत आहेत. त्याला खूप मागणी होती. त्यामुळे जागतिक दहशतवादी संघटना आयसिस जगभरातील स्त्रोतांकडून या गोळ्या मागवत होते. त्यामुळे जगभरातील देशांनी या गोळ्यांवर बंदी घातली. एप्रिल,२०१८ ला केंद्र सरकारने या गोळ्यांवर भारतातही बंदी घातली. जगभरात या गोळ्यांच्या विक्रीवर निर्बंध लादण्यात आल्यामुळे या गोळ्यांचा तुडवडा निर्माण झाला. त्यामुळे तीन-चार पटींनी या गोळ्यांचे भाव वाढले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-03-2023 at 15:44 IST
ताज्या बातम्या