मुंबई – हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र येत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन बंधूंच्या विजयी मेळाव्यातील भाषणानंतर समाजमाध्यमांवर चारोळ्यांचा पाऊस पडू लागला आहे. या दोन नेत्यांच्या भाषणानंतर काही मिनिटातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने अधिकृतपणे समाजमाध्यमांवर एक कविता प्रसारित केली आहे. एक प्रबोधक, दुसरा प्रक्षोभक…एक उजवा, दुसरा डावा या कवितेला ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांनीही कवितेतून उत्तर दिले आहे. एक शिवसैनिक.. दुसरा शाहसैनिक, एक ठाकरे, दुसरा गद्दार असे शाब्दिक युद्धच समाज माध्यमांवर सुरू झाले असून त्यातून कार्यकर्त्यांच्या प्रतिभेलाही धुमारे फुटले आहेत.
ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने सात आठ ओळींची एक कविता प्रसारित केली आहे. या कवितेत राज आणि उद्धव या दोन भावांमधली तुलना नाव न घेता करण्यात आली आहे. त्यातही एक उजवा एक डावा असे म्हणत राज ठाकरे यांची स्तुती करीत त्यांना गोंजारले आहे. एक मराठीचा पुरस्कर्ता, तर दुसरा तिरस्कर्ता, दुसरा वेडाभिसा, दुसरा खुर्चीप्रेमी, दुसरा थोरला असून धाकला असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेतले आहे.
या कवितेवर उत्तरादाखल शिवसैनिकांनी मात्र जो काही पाऊस पाडला आहे तो त्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. त्याचबरोबर मराठी भाषेतील ठेवणीतील शब्द वापरून दोन्ही ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी शिंदे यांना शालजोडीतले दिले आहेत. एक ठाकरे, दुसरा गद्दार, दुसरा विश्वासघातकी, एक ठाकरेंचा वाघ, दुसरा दिल्लीचा लाचार अशा शब्दात शिवसैनिकांनी या मजकूराच्या खाली प्रत्युत्तर दिले आहे.
एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरात घोषणेचा समाचार घेतला आहे. एकाचा मराठीचा अभिमान, दुसऱ्याचा जय गुजरात किंवा एक बोलतो मुंबईसाठी..दुसरा झुकतो गुजरातीसाठी, एक शिवसैनिक..दुसरा शाहसैनिक अशा शब्दात ही जुगलबंदी दिवसभर सुरू होती.